Wednesday, January 20, 2016

१०. ऐक सदैवपणाचे लक्षण | रिकामा जाऊ नेदी येक क्षण |


                                   || श्रीराम ||

|| समर्थ वाणी ||

१०. ऐक सदैवपणाचे लक्षण | रिकामा जाऊ नेदी येक क्षण |

      समर्थांनी वेळेचे महत्व पदोपदी समजावून दिले आहे. आपल्या आयुष्यातला कोणताच क्षण वाया जाऊ न देणे हेच खरे भाग्याचे लक्षण असल्याचे समर्थ ठामपणे सांगतात. समर्थ म्हणतात,

ऐक सदैवपणाचे लक्षण | रिकामा जाऊ नेदी येक क्षण |
प्रपंच व्यवसायाचे ज्ञान | बरे पाहे ||११.३.२४||

आपल्या आयुष्यात वेळेला अतिशय महत्व आहे. गेलेली वेळ परत कधीही येत नाही हे जाणूनच समर्थांनी ‘सिकवण निरुपण’ या समासामध्ये वेळेचे महत्व स्पष्ट केले आहे. सामान्य माणसाने आपले जीवन यशस्वी करण्यासाठी कसे वागावे याची रूपरेषा या समासामधून समर्थ आखून देतात. समर्थांनी प्रयत्नवादाचा पुरस्कार केला. आळस सोडून अचूक प्रयत्न कसे करावेत याविषयी या समासामध्ये समर्थ मार्गदर्शन करतात. प्रात:काली उठून काही पाठांतर करावे, प्रात:स्नान करून संध्या करावी, पितृतर्पण करावे, देवाची पूजा करावी आणि यथासांग वैश्वदेव करावा. व्यवहारात वागताना प्रामाणिकपणा आणि सावधपणा बाळगावा. सर्वाशी गोड बोलावे, स्नेह जोडावा, जेवण झाल्यावर थोडे वाचन, चर्चा करावी, एकांतात बसून निरनिराळ्या ग्रंथांचा अभ्यास करावा. एकही क्षण वाया न घालवण्यामागे वेळेचे व्यवस्थापन दिसून येते.
     
      कल करे सो आज कर, आज कारे सो अब | पल मे परलै होयगी बहुरि करेगो कब || अशा रीतीने जर मनुष्य जगला तर तो शहाणाच होतो. ज्याला आयुष्यात काही करावयाचे आहे त्याने आपला सर्व वेळ सत्कारणी लावावा असा आदर्श समर्थांनी या समासाद्वारे आपल्यापुढे ठेवला आहे.  कोणतेही काम करताना ‘नंतर करू’ असे आपण सहज म्हणून जातो. परंतु नंतर देखील हे काम आपल्यालाच करावे लागणार आहे याचा आपल्याला विसर पडतो. साधे उदाहरण म्हणजे घरातील पसारा किंवा कोणतीही वस्तू जागेवर न मिळणे. वेळच्या वेळी सर्व कामे केल्याने वेळेची बचत होते आणि वेळेचे व्यवस्थापन देखील अचूक होते याचा शेवटी ज्याचा त्यानेच अनुभव घ्यायचा आहे अस वाटत नाही का ?......क्रमशः
                       
                              || जय जय रघुवीर समर्थ ||


No comments:

Post a Comment