Saturday, April 26, 2025

 





|| श्रीराम ||

षड्रिपु मनात लपलेले सहा हॅकर्स...........



उत्तम व्यक्तिमत्व घडवण्यासाठी आपले अंतर्मनातील शत्रू दूर करणे आवश्यक आहे यासाठीच समर्थांचे षड्रिपू निरूपण हे प्रकरण आपल्याला मार्गदर्शक ठरते. मनातील शत्रू आपल्या मनाला नकळत कमकुवत करत असतात. हे शत्रू म्हणजेच ‘षड्रिपु’ ! हे सहा शत्रू कोणते? आपल्या मनात हे सहा हॅकर्स सायलेंट मोडमध्ये लपून बसलेले असतात. ते नेमक मला कसे विचलित करतात? माझ्या निर्णय क्षमतेवर कस राज्य गाजवतात ? आणि आपल्या आयुष्याचं सॉफ्टवेअर कस क्रॅश किंवा करप्ट करतात. समर्थांनी मानवी मनाचा विचार करून या षड्रिपुंची ओळख करून दिली आहे. मंडळी,आपल्यावर राज्य गाजवणारे षड्रिपु हे बाहेरचे शत्रू नाहीत. ते मनाचे हॅकर्स आहेत.यांना ओळखून आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी बघा श्री समर्थ वाणी

https://www.youtube.com/@ShriSamarthVaani
जय श्रीराम

Saturday, April 12, 2025

 एक आनंदाची बातमी 


                         


आजपासून आपण ‘श्री समर्थ वाणी’ या माध्यमातून, आपल्या जीवनाला सकारात्मक दिशा देणाऱ्या समर्थ रामदास स्वामींच्या समर्थ विचारांचा एक दिव्य प्रवास सुरू करतो आहोत.

या चॅनेलच्या माध्यमातून आपण समर्थांच्या वचनांमधून आजच्या काळाला काही उत्तम देण्याचा प्रयत्न राहील. 


समर्थांचे समर्थ विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आपणासर्वांच सहकार्य अपेक्षित आहे. त्यामुळे चॅनल लाईक, शेअर सबस्क्राइब करून सहकार्य करा 


चॅनलची लिंक पुढे देत आहे - https://www.youtube.com/@ShriSamarthVaani 


जय जय रघुवीर समर्थ 





Monday, January 30, 2023

 आगामी प्रकाशन  

' समर्थ वाङ्मयाचा परामर्श '



समर्थ चरित्र सुगंध  (समर्थांच्या आधुनिक चरित्रांचा अभ्यास या माझ्या प्रबंधावर आधारित ) 


 स्मरण समर्थांचे   लेखसंग्रह 

चिरंजीवी  हनुमान चरित्र आणि उपासना याविषयी


या नंतर लवकरच अजून एक लेख संग्रह प्रकाशित होत आहे 


आगामी प्रकाशन 


समर्थ वाङ्मयाचा परामर्श 

९ फेब्रुवारी २०२३ 


स्वामी गोविंददेव गिरि यांचा आशीर्वाद 
डॉ. आरती दातार यांची प्रस्तावना 


संपर्क :  9881477080 माधवी 
             9822734555 संजय 

Saturday, May 5, 2018

उत्तम संगतीचे फळ सुख | अद्धम संगतीचे फळ दु:ख |

२९ उत्तम संगतीचे फळ सुख | अद्धम संगतीचे फळ दु:ख |

    आनंद सांडुनिया शोक | कैचा घ्यावा || १७/७/१७||

मानवी जीवनामध्ये, व्यवहारामध्ये काय किंवा परमार्थामध्ये काय व्यक्तीविकासाच्या जडण घडणीमध्ये संगतीला अत्यंत महत्त्व आहे. संगतीमुळे एक तर प्रगती किंवा अधोगती प्राप्त होते हे लक्षात ठेवून उत्तम संगतीचा आग्रह माणसाने धरावा. सत्संगात राहून माणसाने स्वत:चे मित्र बनून रहावे. आपल्याला कोणाची संगत आहे यावरून आपल्या आयुष्याला निश्चितच कलाटणी मिळते. व्यवहारामध्ये जर उत्तम संगत असेल तर आपल्यातील चांगुलपणाची धार अधिक तीव्र होते. पण एखादी वाईट विचारांची किंवा नकारात्मक विचारांची व्यक्ती आपल्या संपर्कात असेल, त्याला जर काही वाईट सवयी असतील तर आपले मन लगेच विचलित होते. मानवी स्वभावातील एक महत्त्वाचा दोष असा आहे की त्याला वाईट सवयी लगेच लागतात पण उत्तम सवयीसाठी मात्र त्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. जसे पहाटे उठणे, रोज व्यायाम करणे अशा अनेक सवयी सांगता येतील. खरतर आपल्या उत्तम सवयीनां वाईट सवयी बाहेरून येऊन चिकटतात. पण कालांतराने आपल्याला त्याच अधिक योग्य आणि चांगल्या वाटू लागतात. कोणतेही व्यसन जन्माला आल्यापासून लागलेले नसते. तर कोणाचे तरी बघून, काही तरी वेगळे करून बघण्याच्या बहाण्याने केवळ आकर्षण म्हणून व्यक्ती त्या सवयीकडे वळते. नंतर त्यागोष्टीच्या तो इतकी आधिन होते की त्यामध्ये काही गैर आहे असे त्याला वाटेनासे होते. हे झाले बाह्य सवयीचें. संत आम्हाला विकारांचा त्याग करावयास सांगतात. वरील ओवीमध्ये उत्तम संगतीने सुख मिळते हे ठाऊक असताना देखील आनंदाचा अव्हेर करून दु:ख  पत्करणाऱ्या अविवेकी माणसांना समर्थ सत्संगाचे महत्त्व समजावून सांगतात.

नारद भक्तिसूत्रामध्ये ४३ व्या सूत्रात “ दुसंग: सर्वथा त्याज्य: ” हे सूत्र आले आहे. दु:संगाचा अंतर्बाह्य त्याग करता येणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण हा संग जीवाला सत्संगापासून परावृत्त करतो. मुळात शुद्ध असणारा आत्मा देहाच्या संगतीत आल्यानंतर त्याची काय अवस्था होते हे समर्थ १७ व्या दशकामध्ये पाण्याचा दृष्टांत देऊन स्पष्ट करतात. पाणी हे मुळात स्वच्छ असते पण अनेक प्रकारच्या वेळी वनस्पतींमध्ये ते शिरते आणि त्यांच्या संगतीचा दोष लागून ते आंबट, तिखट, कडू बनते. तसेच आत्मा हा मुळात शुद्धच असतो पण त्याला देहाची संगत लागली की त्याचे शुद्धपण लोपते आणि त्याच्यामध्ये विकार उत्पन्न होतात. हे विकार जर नष्ट करावयाचे असतील तर त्यांची आई जी “आसक्ती” तिलाच मारले तर तिची सर्व पिल्ले आपोआप मरून जातात असे समर्थांचे सांगणे आहे. परंतु यासाठी उत्तम संगतीची आवश्यकता आहे.

चांडाळा संगती होईजे चांडाळ | होय पुण्यशीळ साधुसंगे | १ |
कुरुंद संगती झिजला चंदन | कुसंगे जीवन नासतासे | २ |
दुर्जन संगती सज्जन ढासळे | क्रोध हा प्रबळे अकस्मात | ३ |
दास म्हणे संग त्यागा दुर्जनांचा | धारा सज्जनाचा आदरेसी | ४ |

या सृष्टीतील विवेकी लोकांची सांगत प्रत्येकाने धरावी असा समर्थांचा आग्रह आहे.  संगत नेहमी अशाच माणसांची धरावी ज्याच्या संगतीत आपले अंतरंग पालटते. सत्संगती लाभणे ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. आणि ती टिकणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे…….

Monday, March 21, 2016

२८. आपणास चिमोटा घेतला | तेणे कासाविस जाला |


|| समर्थ वाणी ||

२८. आपणास चिमोटा घेतला | तेणे कासाविस जाला | 
आपणावरून दुसऱ्याला | राखत जावे ||१२/१०/२४||

            लोकसंग्रहाच्या दृष्टीने उपयुक्त असे सूत्र समर्थ याठिकाणी सांगत आहेत. माणसाने नेहमी स्वत:वरून दुसऱ्याची परीक्षा करावी अस म्हणतात. माणसांची जिव्हा हे असे इंद्रिय आहे की त्यावर संयम खूप अवघड आहे. मग तो बोलण्याचा असो अथवा खाण्याचा. याठिकाणी आपल्या बोलण्यावर संयम कसा ठेवावा याविषयी सांगताना समर्थ वरील दृष्टांत देतात. आपल्याशी जर कोणी गोड शब्द बोलले तर मनाला आनंद होतो, हा तर आपला अनुभव आहे मग स्वत: वरून दुसऱ्याला आपल्यासारखेच मानावे असे समर्थ सांगतात. कोणी आपल्याशी कठोर बोलले तर मनाला यातना होतात. मग आपण कोणाला कठोर बोलताना निश्चितच असंख्य वेळा विचार केला पाहिजे. आपल्याला चिमटा घेतला तर आपल्याला वेदना होतात हे लक्षात ठेवून दुसऱ्याला दु:ख देऊ नये. जेव्हा एखादे काम समूहामध्ये करत असाल तेव्हा नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीने तर या सूत्रांचा निश्चितच विचार करणे गरजेचे आहे.

            लोकसंग्रह करायचा असेल तर कठोर वाणीचा त्याग करता आला पाहिजे. कारण अशी वाणी दुसऱ्या बरोबर स्वत:चा देखील नाश करू शकते. आपण जे पेरतो तेच उगवते हा तर नियम आहे. आपलं जसे बोलतो तसेच प्रतिउत्तर येते याचेही भान असावे. हे सूत्र लक्षात आले म्हणजे मग विनाकारण कठोर आणि कटू शब्द बोलले जाणार नाहीत. कठोर वाणी असणाऱ्यांची समर्थ निर्भत्सना करतात. ज्यांची वाणी कठोर आहे, जे तोंडाळ, शीघ्रकोपी, आहेत त्यांनां समर्थांनी राक्षस म्हणून संबोधले आहे.
           
            लोकसंग्रह करताना ‘माझेच म्हणणे खरे’ असे म्हणून चालणार नाही. लोकांना बरोबर घेऊन कार्य पूर्ण करावे.सैन्यावाचून एकटा सेनापती जसा लढू शकत नाही त्याचप्रमाणे नेतृत्व करणारा अनेकांशी भांडून एकटा कार्य करू शकत नाही. त्याने कार्य करताना सर्वांना आपलेसे करून ठेवावे......क्रमशः


|| जय जय रघुवीर समर्थ || 

Sunday, March 20, 2016

२७. पर्णाळि पाहोन उचले | जीवसृष्टी विवेके चले |

|| समर्थ वाणी ||

२७. पर्णाळि पाहोन उचले | जीवसृष्टी विवेके चले |
आणि पुरुष होऊन भ्रमले | यासी काय म्हणावे || १२/१/११||

प्रापंचिक माणसाने प्रपंच आणि परमार्थ करताना सतत सावध राहणे गरजेचे आहे. ‘सावधपण सोडू नये’ असे सांगून सतत सावधानतेचा इशारा देणारे समर्थ याठिकाणी एक सुरेख दृष्टांत देतात. झाडाच्या पानावरील कृमीकीटक देखील विचारपूर्वक पाउल उचलतात. मग माणसाने तर विवेकाने वागलेच पाहिजे. सारे जीवप्राणी विचारपूर्वक कर्म करतात, मग सर्व प्राणीमात्रात सर्वश्रेष्ठ असणाऱ्या माणसाने अविवेकाने का वागावे ? जगात वावरताना आपल्या सभोवताली काय चालू आहे याचे भान माणसाला असणे आवश्यक आहे. सर्व बाजूंचा विचार करून जो सावधपणे जगतो तो खरा आनंदी होतो. पण परिस्थिती नीट समजून घेतली नाही तर कोणते संकट केव्हा कोसळेल याचा नेम नसतो. बरेचदा असा प्रसंग येतो की संकटात सावरायला देखील वेळ मिळत नाही. यासाठीच प्रत्येक कर्म करताना सावधगिरी बाळगून कर्म करावे अशी सावधगिरीची सूचना समर्थ देत आहेत.
यासाठी आपल्या आसपास असणारे अनुभवी, दूरदृष्टी असणारे लोक काय विचार करतात ते पहावे. दुसऱ्यापासून शिकावे ही जनरीतच आहे. त्यामुळे आपल्या भोवतालची शहाणी माणसे शोधून काढावीत आणि त्यांच्यातील गुण आत्मसात करावेत. त्यांच्या सहवासात राहून आपल्या अवगुणांचा प्रयत्नपूर्वक त्याग करावा. आपल्या सहवासातील माणसांची योग्यता ओळखून असावे. याचा अर्थ कमी योग्यतेच्या माणसांचा अवमान करावा असे नाही. तर कोणाचे मन दुखवू नये पण मनोमनी योग्यता ओळखून असावे. प्रत्येकाची योग्यता ओळखून त्यांना धोरणाने जवळ करावे अथवा लांब ठेवावे. ज्या माणसाला जेवढे महत्व किंवा मोठेपण द्यावयाचे तेवढे त्यास बरोबर देण्याचे चातुर्य या जगात जगताना आले पाहिजे.....क्रमशः

|| जय जय रघुवीर समर्थ ||

madhavimahajan17@gmail.com

Saturday, March 12, 2016

२६. रूपलावण्य अभ्यासिता न ये | सहजगुणास न चले उपाये |



|| समर्थ वाणी ||


२६. रूपलावण्य अभ्यासिता न ये | सहजगुणास न चले उपाये |


काही तरी धरावी सोये | अगांतुक गुणांची || १४/६/१||


समर्थ रामदास स्वामी गुणदोषांचे विवेचन करत असताना ही ओवी सांगतात. आपल्याला प्राप्त झालेले रूप आणि सौंदर्य हे गुण अभ्यास शिवाय किंवा प्रयत्नाशिवाय प्राप्त झाले आहेत. यामध्ये आपण काहीच बदल करू शकत नाही. पण उत्तम गुण मात्र प्रयत्नपूर्वक अभ्यास करून प्राप्त करू शकतो. माणसाने प्रयत्न करून उत्तम गुण आपल्या अंगी बाणवले पाहिजेत. कारण आपल्याला जे नशिबाने मिळालं नाही ते आपण प्रयत्नाने मिळवू शकतो.

चातुर्य लक्षणातील ही ओवी समर्थांनी यापूर्वी दुसऱ्या दशकात देखील सांगितली आहे. सद्विद्या लक्षणामध्ये त्रिगुणांमध्ये वावरणाऱ्या माणसाला आत्मसुधारणा होण्यासाठी एका आदर्शाची जरुरी असते. सद्विद्या लक्षणामध्ये अशा आदर्श पुरुषाची लक्षणे समर्थांनी सांगितली आहेत. यामध्ये ज्या उत्तम गुणांची यादी समर्थ देतात हे उत्तम गुण प्रयत्न केले तर सहज साध्य होतात. प्रयत्नपूर्वक ते अंगी बनण्याचा प्रयत्न करावा असे समर्थ आवर्जून सांगतात.


समर्थांनी चौदाव्या दशकामध्ये देखील पुन्हा हाच विषय विस्ताराने सांगितला आहे. प्रत्येक माणसाला जगामध्ये थोडा तरी बदल करता येणे शक्य आहे हा समर्थांचा विश्वास आहे. पण जग बदलण्यापूर्वी सुधारणेची सुरवात प्रत्येकाने स्वत:पासून करावी. आपल्याला प्राप्त झालेले रूप आणि सौंदर्य हे गुण अभ्यासा शिवाय प्राप्त झालेले आहेत. यामध्ये आपण कोणताच बदल करू शकत नाही. परंतु उत्तम गुण मात्र अभ्यासपूर्वक प्रयत्न केले तर सहज साध्य होऊ शकतात. या उत्तम गुणांचे वैशिष्य हे की या गुणांमुळे माणसाचे सौंदर्य अधिक खुलून येते. लोकांना त्याचा सहवास प्रिय होतो. जो माणूस चातुर्याने आपले अंतरंग सुधारतो तो खरा भाग्यवान ठरतो.


चातुर्य श्रुघारे अंतर | तेणे लोकांच्या हातासि काये आले |
दोहीमध्ये कोण थोर | बरे पहा ||१४/६/१८||


आपल्या शहाणपणाने जो आपले अंतरंग सुधारतो आणि जगाचे कल्याण साधतो तो खरा भाग्यवान. असे भाग्यवान होण्यासाठी सतत उत्तमाचा पाठपुरावा करावा आणि उत्तम गुण अंगी बनावेत. स्वत: बरोबर अनेकांचा उद्धार करावा .....क्रमशः



|| जय जय रघुवीर समर्थ ||