Tuesday, January 29, 2013

समर्थांची समर्थ विचार सूत्रे


                                                                        ॥ श्रीराम ॥

                                                            समर्थांची समर्थ विचार सूत्रे 

डॉ. माधवी महाजन


   भारतीय संस्कृतीत पूर्वीपासूनच मानवी मनाचा, शरीराचा आरोग्याचा , विश्वाचा, निसर्गाचा तसेच जगण्यासंबधीच्या नियमांचा असा सर्वांगीण अभ्यास झाला आहे. आनंदी जीवन कसे जगावे याचा मूलमंत्र भारतीय संस्कृतीने दिला आहे. भारतीय संस्कृतीत अव्दैताला महत्व दिले आहे. अव्दैत म्हणजे माझ्या सारखाच दुसरा आहे ही भावना. अव्दैताला महत्व देऊन विश्वावर आपलेपणाने प्रेम करा अशी व्यापक विचारांची शिकवण भारतीय संस्कृतीने दिली. भौतिक जगात जगताना खरे सुख , शाश्वत सुखाच्या उगमापर्यत पोहोचवणारी विचारधारा या संस्कृतीने दिली. ॠषीमुनींनी शाश्वत सुखाची प्रचिती घेतली आणि हा आनंद सर्वांपर्यत पोहोचवण्यासाठी कार्यरत राहीले. ते केवळ अव्दैतात रमले नाहीत तर सर्व जगाशी एकरुप झाले.

            शाश्वत सुखाचा मार्ग मनुष्याला वेदांनी दाखविला. भगवद्गीतेत श्रीकृष्णाने तो उलगडून दाखविला आणि भारताला लाभलेल्या संत परंपरेने तो मार्ग सामन्य माणसाला सोप्पा करुन दाखविला. आजच्या २१व्या शतकात देखील संतांचे विचार, त्यांचे साहित्य, एखाद्या दिपस्तंभाप्रमाणे आपल्याला मार्गदर्शक ठरते. या संत वाड्मयामध्ये समर्थ रामदासस्वामी यांचा श्रीमद दासबॊध हा ग्रंथ प्रापंचिकांसाठी, राजकीयव्यक्तींसाठी, साधकांसाठी, तसेच रोजच्या व्यवहारासाठी देखील अत्यंत उपयुक्त ठरतो. सर्वात महत्वाचे म्हणजे व्यक्ती विकासाच्या दृष्टीने या ग्रंथाचे महत्व अनन्य साधारण आहे. त्यांचे विचारधन प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तीमत्वाच्या जडणघडणीत उपयुक्त आहे. मानवी मन हे अत्यंत चंचल आहे पण या मनाचा, प्रवृत्तीचा समर्थांनी सखोल अभ्यास केला असल्याचे त्यांच्या विचार सूत्रांमधून आपल्या प्रत्ययास येते.

            श्रीमद दासबोध, २० दशक आणि २०० समास असे स्वरुप असणा-या या ग्रंथात ७७५१ ओव्या आहेत. प्रत्येक दशकातील १० समासांमध्ये एक सूत्र पकडून समर्थांनी तो विषय विस्ताराने मांडला आहे. स्तवनाने प्ररंभ करुन समर्थ आत्मज्ञानाच्या खोल गाभ्यापर्यंत आपल्याला घेऊन जातात. प्रपंचापासून ब्रह्मऎक्य साधण्यापर्यंतचे सर्व विषय समर्थ या ग्रंथात हाताळतात. अध्यात्मशास्त्राच्या या ग्रंथामध्ये मानवी जीवाचा उध्दार हा प्रधान हेतू दिसून येतो.

            भारतीय तत्वज्ञान मानवी जीवनातील अज्ञान दूर होऊन त्याच्या जीवनात त्याला पूर्णत्व कसे प्राप्त करुन घेता येईल याचा पाठपुरावा करते. समर्थांचा श्रीमद दासबोध हा ग्रंथ आदर्श मानवी जीवन कसे असावे याचे मौलिक मार्गदर्शन घडवतो. माणसाला परमेश्वराने अनेक दैवी गुणांनी युक्त असे घडवले. मानवी देह घडवताना २६ दैवी गुण आणि फ़क्त ६ च असुरी गुण देवाने या नरदेहाला बहाल केले. या गुण अवगुणांचे फ़ायदे तोटे कसे आहेत या गुणांचा योग्य वापर करुन उत्तम व्यक्तिमत्व कसे घडु शकते या विषयी समर्थ अनेक समासामधुन मार्गदर्शन करतात.

            या दैवी गुणांपैकी एक म्हणजे आपल्याला प्राप्त झालेले वाणीचे सामर्थ्य. शारदास्तवनाच्या समासामध्ये शारदामातेचे स्तवन करुन समर्थांनी आपण मांडलेल्या ग्रंथ प्रपंचासाठी उत्तम शब्दसामर्थ्य प्राप्त व्हावे म्हणून आशीर्वाद मागुन घेतला आहे. वाणीचे महत्व दासबोधाप्रमाणे समर्थांनी मनाच्या श्लोकात देखील स्पष्ट केले आहे,
स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे । मना सर्व लोकांसी रे निववावे ।

लोकसंग्रहाच्या दृष्टीने समर्थांनी वाणीचे महत्व वारंवार स्पष्ट केले आहे. आजच्या युगात देखील कामाच्या ठिकाणी "टिमवर्क" असते तेव्हा परस्परांच्या सहाय्याने कोणतेही काम पूर्णत्वाला जात असते. अशावेळी एकमेकांना समजावून घेऊन कोणाचे मन न दुखावता काम करणे गरजेचे असते. आपली वाणी जर गोड असेल , दुस-याला जाणून घेण्याची क्षमता असेल तर अशा व्यक्ती जीवनात यशाच्या शिखराच्या दिशेने वाटचाल करताना आपण पहातो.

                                                 जगामध्ये जगमित्र । जीव्हेपाशी आहे सूत्र ॥ दा. १९.२.१९ ॥

लोकसंग्रहाचे केवढे महत्वाचे सूत्र समर्थ आपल्याला सांगतात. आपल्या बोलण्यातून आपण अनेक मित्र जोडत असतो तसेच अनेक शत्रू देखील निर्माण करत असतो. जगात जर जगमित्र व्हायचे असेल तर त्याचे वर्म आपल्या जिव्हेपाशी आहे. ’ उत्तमपुरुष लक्षण ’ याविषयी निरुपण करताना स्वत:वरुन दुस-याचे अंत:करण कसे जाणावे याचे सोप्पे सूत्र सांगितले आहे.

                                                कठीण शब्दे वाईट वाटते । हे तो प्रत्ययास येते ।
तरी मग वाईट बोलावे ते । काय निमित्ते ॥ दा. १२.१०.२३ ॥

माणसाने नेहमी स्वत:वरुन दुस-याची परीक्षा करावी. दुस-याच्या कटू बोलण्याने जसे आपले मन दुखावते तसेच आपल्या कठोर शब्दाने दुस-याचे मन दुखावू शकते. दुस-याचे मन दुखावणे ही एक प्रकारे हिंसाच आहे . अशी मानसिक हिंसा आपल्याकडून घडू नये यासाठी समर्थ आपल्याला सावध करतात.

                                                आपणास चिमोटा घेतला । तेणे कासाविस जाला ।
आपणावरुन दुस-याला । राखत जावे ॥ दा. १२.१०.२४ ॥

अव्दैताचे प्रत्यक्ष व्यवहारिक स्वरुप समर्थांनी या विचारातून शिकविले आहे.

              जगामध्ये जगमित्र होण्यासाठी प्रथम एकमेकांविषय़ी वाटणारा राग, व्देष, मत्सर, या दुर्गुणांचा त्याग होणे गरजेचे आहे. स्वत:च्या विकासासाठी सुदृढ आरोग्यासाठी आणि मनाच्या प्रसन्नतेसाठी समर्थांनी षड्रिपुंवर विजय मिळवण्यास सांगितले आहे. क्रोध हा माणसाचा प्रधान शत्रू आहे हा क्रोध बळावतो कसा तर समर्थ म्हणतात,
अभिमानें उठे मत्सर | मत्सरें ये तिरस्कार |
पुढें  क्रोधाचा  विकार | प्रबळे  बळें || दा. १.१.२३ ||

विचारशक्ती नष्ट करणारा, स्वत:बरोबर इतरांचा नाश करणा-या क्रोधावर विजय मिळवण्याची शिकवण समर्थ देतात. भगवद्गीतेत भगवंतांनी स्पष्ट्पणे सांगितले आहे की, " क्रोधामुळे भ्रम होतो, विवेक सुटतो, भ्रमामुळे तसेच अविवेकामुळे विस्मरण होते, विस्मरणामुळे निश्च्यात्मक बुद्धी नष्ट होते आणि बुद्धीनाश झाला , विवेकाचा नाश झाला की सर्वस्वाचा नाश होतो ( अ २. श्लो. ६३ ) स्वत: बरोबर इतरांचा नाश करणा-या क्रोधाला मनातून हद्दपार करायला सांगुन समर्थ आपल्याला सावधच करतात. एखाद्या भुकंपाप्रमाणे आपल्या शरीराची व मनाची हानी करणा-या क्रोधावर विजय मिळवून आनंदी जीवन जगण्याची कलाच समर्थ आपल्याला शिकवतात.

                                                दंभ दर्प अभिमान | क्रोध आणि कठिण वचन |
हें आज्ञानाचें लक्षण | भगवद्‍गीतेंत बोलिलें || दा. १२.१०.२८ ||

क्रोधाबरोबरच दंभ, दर्प, अभिमान, कठोरवाणी यापासून कोसो दूर राहण्यास सांगतात. ही सर्व अज्ञानाची तसेच असुरी लक्षणे आहेत.  समर्थांनां सर्वात जास्त चीड या नैतिक दुर्गुणांची आहे. समर्थ आपल्या महंतांना उत्तम महंत होण्यासाठी महंत व्हा पण महंती करु नका असे बजावतात. महंती म्हणजे महंतपणाचा डामडौल . हा डामडौल, खोटा दिमाख याचा समर्थांना तिटकारा आहे. विकारांवर विजय मिळवला तरच मन:शांती मिळणे शक्य आहे हे जाणुनच समर्थ आपल्याला वारंवार या दोषांपासून दूर राहण्याच आग्रह करतात.

                                                अवगुण सोडितां जाती | उत्तम गुण अभासितां येती |
कुविद्या  सांडून  सिकती  |  शाहाणे  विद्या  || दा. १४. ६. ५ ||

हे दासबोधाचे प्रधान सूत्र आहे. स्वभावाला औषध नाही असे म्हणतात. परंतु प्रयत्नांच्या आधारे माणुस आपल्यामध्ये हवा तसा बदल घडवुन आणु शकतो हा विश्वास समर्थ आपल्या मनात जागा करतात. अचुक प्रयत्नांच्या आधारे मनावर संयम ठेवून, सातत्याने उत्तम गुण अभ्यासपूर्वक आपल्यात आणण्याचा प्रयत्न केला तर हे परिवर्तन सहज शक्य आहे हे समर्थ वरील ओवीत ठामपणे सांगतात.

              समर्थांनी आपल्या कृतीतून, विचारांतून, प्रयत्नवादाचा पुरस्कार केला. " यत्न तो देव जाणावा । यत्नेविण दरिद्रता " या बोधवाक्यातून समर्थ आपल्याला प्रयत्नांना देव मानण्याची शिकवण देतात. कोणत्याही गोष्टीत यश मिळविण्यासाठी " अचूक " प्रयत्न आणि कष्ट करण्याची तयारी महत्वाची आहे. हे जाणून समर्थांनी यत्नवादाचा पुरस्कार केला.

                                                 कष्टेंविण फळ नाहीं | कष्टेंविण राज्य नाहीं |
केल्याविण होत नाहीं  |  साध्य जनीं || दा. १८. ७. ३ ||

समर्थांच्या या उक्तीमधुन मनाच्या संकल्प शक्तीचा प्रत्यय येतो. अचुक प्रयत्न आणि जिद्द तसेच कष्ट केल्याने सुखाची प्राप्ती होते. पुरेशा प्रयत्नांच्या अभावाने अपयशाचे दु:ख पचवावे लागते. काही माणसे अशी असतात की त्यांना आपल्या प्रतिष्ठेला शोभेल असेच काम करायला आवडते. त्यामुळे आयुष्यात आलेल्या अनेक संधी त्यांना गमवाव्या लागतात.

                                                आधीं  कष्टाचें  दुःख सोसिती  |  ते पुढें  सुखाचें  फळ
भोगिती | आधीं आळसें सुखावती | त्यास पुढें दुःख || द. १८. ७. ५ ||

मनुष्याने जर अचूक प्रयत्न केले तर त्यांच्या ऎहिक, पारलौकिक व पारमार्थिक सुखाच्या सर्व ईच्छा पूर्ण होतात. सातत्य, चिकाटी , दृढनिश्चय आणि ठाम विश्वास ही पुंजी जवळ असेल तर यशश्री आपल्या पासुन नक्कीच लांब नाही. अचुक प्रयत्न, जिद्द तसेच कष्ट केल्याने सुखाची प्राप्ती होते. पण प्रयत्नांची कास न धरता केवळ दैवावर हवाला ठेवून आळशीपणा केला तर मात्र अपयश पदरात पडते. शत्रू हे केवळ बाहेरच्या कोणा व्यक्तीच्या रुपात असतात असे नाही तर ते आपल्या मनातही असतात. आळस हा आपला सर्वात मोठा शत्रू आहे. या दुर्गुणामुळे प्रयत्न करण्याची ईच्छाच होत नाही. एवढेच नाही तर वेळेचा देखील त्याला उपयोग करुन घेता येत नाही. आळस हा अवघ्या मानव जातीचा शत्रू आहे ज्याचा निषेध समर्थ करतात. आळस हे करंटेपणाचे लक्षण आहे. आपल्याला सर्वस्वी बुडविणा-या आळसाचाच आळस करण्य़ाची शिकवण समर्थ देतात. कामचुकारपणा करायला लावणा-या आळसाचा प्रयत्नपूर्वक त्याग करायला समर्थ सांगतात.

                                                 केल्याने होत आहे रे । आधी केलेचि पाहिजे ।
यत्न तो देव जाणावा। अंतरी धरीता बरे ॥

असे विचारधन देऊन समर्थांनी लोकांना प्रयत्नवादी बनविले. आपल्या प्रबोधनातून अंधश्रध्दा व आळस यांच्यावर त्यांनी घालाअ घातला आहे.

                                                ऐक  सदेवपणाचें  लक्षण | रिकामा  जाऊं  नेदी
येक क्षण | प्रपंचवेवसायाचें ज्ञान | बरें पाहे || दा. ११.३.२४ ||

समर्थांनी ’सिकवण निरुपण ’ समासामध्ये सामान्य माणसाने आपले जीवन यशस्वी होण्यासाठी वेळेचे महत्व समजावून सांगितले आहे. आळसामध्ये आपल्या आयुष्याचा कोणताही क्षण वाया न जाऊ देणॆ हेच खरे भाग्याचे लक्षण असल्याचे समर्थांचे ठाम मत आहे. ज्याला आपल्या आयुष्यात काही करावयाचे त्याने आपला वेळ सत्कार्णी लावावा असा आदर्श समर्थांनी या समासाव्दारे आपल्या समोर ठेवला आहे. " बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले " समर्थांनी स्वत: याच पध्द्तीने आपले आचरण ठेवले होते.

               समर्थांनी आपल्या या ग्रंथामध्ये अनेक विषयांवर निरुपण करुन आपले जीवन आनंदी करण्यासाठी अनेक जीवनमूल्ये आपल्या समोर छोट्या छोट्या सूत्रांमधून व्यक्त केली आहेत. जगण्यावर भरभरुन प्रेम करायल शिकविणारा हा ग्रंथ सृष्टीचा मनापासुन आस्वाद घ्या पण आसक्त होऊ नका हा संदेश देतो. कारण ही आसक्ती दु:खाचे मूळ कारण आहे. विवेकाच्या आधारे मन ताब्यात ठेवून जीवनमार्ग आक्रमण केला तर निश्चितच सुखी, आनंदी जीवन जगता येऊ शकते. विविध विषयांमागे धावणारे मन कसे स्थिर ठेवता येईल याचे मार्गदर्शन या ग्रंथात घडते.

               सर्वसामान्य मनुष्य विषयलोलुप असतो. या भौतिक जगात जगताना सर्व सुखसोयी मिळाव्यात यासाठी झगडत असतो. या सुखांच्या मागे धावता धावता सुखाचा शोध कधीच संपुन जातो. केवळ धावणे आणि सुखसुविधा उपलब्ध करुन घेणॆ या गोंधळात सतत कष्ट करत राहुनही तो असंतुष्टच राहतो. सर्व सुखे त्याच्या दारात आली तरी वाढत्या गरजांमुळे फ़क्त असमाधानीच जीवन जगतो. सुखांच्या शोधात धावता धावता मन:शांती गमावून बसतो.

               समर्थांनी १२ व्या दशकात सुखी, समाधानी जीवनाचे, मन:शांती प्राप्त करुन घेण्याचे अत्यंत सोपे सूत्र समजावून सांगितले आहे. समर्थांचा प्रपंच करण्याला विरोध नाही. उलट ते म्हणतात,

                                                        प्रपंच करावा नेमक । पहावा परमार्थ विवेक ।
जेणे करिता उभय लोक । संतुष्ट होती ॥

प्रपंचातील योग्य कर्म करुन परमार्थ साधण्याची कला समर्थ शिकवितात. हा प्रपंच नेटका करताना नकारात्मक विचारांना मनात स्थान न देता सकारत्मक विचारांवर भर देण्यास समर्थ सांगतात.

               नेटका प्रपंच करत असताना परमार्थपभ करणे गरजेचे आहे या समजुतीने आपण पूजापाठ, नामस्मरण, पोथीवाचन करित असतो. परंतु या कर्मा बरोबरच नकारात्म्क कर्मे देखील तेव्हढीच किंबहूना जास्तच करत असतो. सकाळी पूजापाठ किंवा नामस्मरण करतो. दासबोधाचा समास वाचतो पण त्याच बरोबर दुस-याची निंदा करणे, दुस-याचे दोष काढणे, राग , तिरस्कार अशा कृतीपण आपल्याकडून तितक्याच सहजपणे घडत असतात. त्यामुळे आपण धड ना नेटका प्रपंच करत ना धड परमार्थ . या नकारात्मक विचारांचे उच्चाटण करुन सकारात्मक विचारांच्या सहाय्याने ’नेटके’ आणि ’ नेमके’ आनंदी जीवन कसे जगता येईल हे उलगडून दाखविणारा श्रीमद दासबोध हा ग्रंथ आपल्याला आजही मार्गदर्शक ठरतो.

               आज काळ बदलला, युगे बदलली, मनुष्याचे राहणीमान बदलले, विज्ञान प्रगत झाले परंतु माणसाची वृत्ती मात्र तशीच राहीली. त्यामुळे प्रगतीच्या अत्युच्च शिखरावर पोहोचून देखील मनुष्य असमाधानीच राहीला. माझे ते माझे आणि तुझे तेही माझेच ही त्याची वृत्ती इतकी बळावली की हिंसाचार वाढला. गणेशस्तवनामध्ये बुद्धीची देवता असणा-या गणेशाचे स्तवन समर्थ करतात. गणेशाच्या कृपेने आपल्याला अशी सूक्ष्म बुद्धी प्राप्त झाली म्हणून त्याच्यापुढे नतमस्तक होतात. आजच्या २१व्या शतकात मात्र मनुष्य आपल्याला प्राप्त झालेल्या या सामर्थ्याचा उपयोग दुस-याच्या नाशासाठी करताना दिसतो. जगात घडणारे अतिरेकी हल्ले, बॉम्बस्फ़ोट या घटनातून यागोष्टी प्रकर्षाने जाणवतात. राग, व्देष, मत्सर, कोणत्या प्रकारची टोकाची हानी करु शकतात याचे आपल्याला प्रत्यंतर येते. विकारांच्या आधीन गेलेला मानव अत्यंत अस्वस्थ, अस्थिर, असमाधानी आयुष्य व्यतित करत आहे. प्रगतीच्या शिखराकडे वाट्चाल करणारा मानव विचारांनी मात्र अप्रगतच राहीला असे वाटते. विचारांची व्यापकता त्याच्यामध्ये नसल्यामुळे समर्थांच्या उपासनेचा व्यापक अर्थ त्याच्या मनापर्यंत पोहोचु शकत नाही. उपासनेचा गजर करणारे समर्थ " विश्वावर आपलेपणाने प्रेम करा " ही उपासना शिकवितात. सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी अंतरात्मा आहे. म्हणून कोणाचेही अंत:करण न दुखावणे ही उपासना सांगतात.

             आजच्या परिस्थितीत काही चांगले घडावयाचे असेल तर सकारात्मक विचारांना दिशा देणारे तसेच मन:शांती देणारे समर्थांचे वाड्मय नक्कीच मार्गदर्शक ठरणारे आहे. त्यांच्या ग्रंथातील समर्थ विचारानेच समाज सशक्त आणि समर्थ बनणार आहे. समर्थ आपल्यात राहूनच आपल्याला मार्गदर्शन करीत आहेत. त्यासाठी सावधपणे, उघड्या डोळ्यांनी त्यांचा शोध घेतला पाहिजे, तरच त्याचा प्रत्यय येणार आहे.

                                                      धर्मस्थापनेचे नर । ते ईश्वराचे अवतार ।
झाले आहेत पुढे होणार । देणे ईश्वराचे ॥

.....................................................................जय जय रघुवीर समर्थ.............................................
नमस्कार   :)

           
       या संकेतस्थळावर समर्थ रामदासस्वामी लिखित श्रीमद दासबोध या ग्रंथामधील निवडक ओव्या घेऊन

त्यावरील चिंतन असे लिखाण करण्याचा मानस आहे. समर्थ रामदासस्वामी आणि त्याचे विचार आपल्याला

सतत मार्गदर्शक ठरतात. परंतु अध्यात्मिक ग्रंथ वा त्यातील विचार याबद्दल पाहण्याचा दृष्टीकोण काहीसा

संकुचित असल्यामुळे या ग्रंथाकडे , विचाराकडे दुर्लक्ष केले जाते. परंतु जेव्हा यातील विचारांचे वाचन करून

चितन मनन घडते तेव्हा ते विचार कृतीत उतरवणे किती गरजेचे आहे हे वाचकांच्या लक्षात येते.
       
        आजच्या सामाजिक परिस्थितीबद्दल वेगळे लिहिण्याची गरज नाही . परंतु खूप कामात व्यस्त असणारे

आपण इतरांना काय स्वत:ला देखील वेळ देऊ शकत नाही. घरात , घराबाहेर,  ऑफीसमध्ये कुठेच आपल्याला

स्वस्थता लाभत नाही. भरपूर पैसा, गाडी, बंगला, सर्व सुखसोयी असताना देखील मनाला शांतता वा समाधान

लाभत नाही.  अशा या मनाच्या अवस्थेमध्ये श्रीमद दासबोधासारखे ग्रंथ मनाला निश्चित दिशा देण्याचे काम

करतात. मनावर संयम मिळविण्यासाठी कशाप्रकारचा विचार, वर्तन अपेक्षित आहे याविषयी हे ग्रंथ

निश्चितच मार्गदर्शक ठरतात.

          अशा या दासबोधाचे स्वरूप काय ? दासबोध ग्रंथ मला नेमके काय देऊन जातो याचा आढावा घेणारा

लेख प्रथम लिहून या संकेतस्थळाला आपण प्रारंभ करणार आहोत. त्या नंतर दासबोधातील निवडक

ओव्याच्या आधारे दासबोध समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत .

           याशिवाय समर्थ रामदासस्वामी यांचे चरित्र, वाड्मय आणि इतर विषया वरील लेख तसेच भीमरूपी स्तोत्रावरील चिंतन वाचण्यासाठी समर्थ वाणी याठिकाणी भेट द्यावी धन्यवाद
                                                         
                                                         जय जय रघुवीर समर्थ