Saturday, January 9, 2016

६. सत्यमार्ग सांडू नये | असत्य पंथ जाऊ नये |

                                  || श्रीराम ||


|| समर्थ वाणी ||

६. सत्यमार्ग सांडू नये | असत्य पंथ जाऊ नये |

                  सत्यमार्ग सांडू नये | असत्या पंथे जाऊ नये |
                  कदा अभिमान घेऊ नये | असत्याचा || दा. २/२/४०||  

      समर्थ ‘उत्तम लक्षणे’ स्पष्ट करताना सत्याची कास धरण्याचा मोलाचा उपदेश केला आहे. वाणीचे पावित्र्य जपताना समर्थ असत्य वाणीचा त्याग करण्यास सांगतात. आपल्या जीवनात सर्व सुंदर गोष्टींचे संतुलन असावे यासाठीच समर्थ आपल्याला सत्यमार्ग सोडू नका असे सांगतात. मनाच्या श्लोकात समर्थ म्हणतात,
                 मना सर्वथा सत्य सोडू नको रे | मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे |
                 मना सत्य ते वाचे वदावे | मना मिथ्य ते मिथ्य सोडोनि द्यावे || १९ ||
      नेहमी सत्य बोलावे यावर समर्थांचा भर आहे. सत्य बोलताना हेतू शुद्ध असला पाहिजे. त्यामध्ये स्वत:चा स्वार्थ लपलेला नसावा. तसेच त्याचा परिणाम देखील चांगलाच असावा. या सत्यवचनात दुसऱ्याचा घात करणारे सत्य अपेक्षित नाही. तर धर्माला अनुसरून दुसऱ्याला हितकारक असे सत्यप्रिय वचन समर्थांना अधिक प्रिय आहे. गायीचा मृत्य टाळण्यासाठी बोललेले असत्य वचन हे असत्य असले तरी त्या परिस्थितीत ते अनुकूलच होते. सत्य वचन अंगी बाणावे पण त्याचा वापर देखील सावधपणे करावा. सत्य बोलताना सारासार विचार महत्वाचा आहे. तसेच दुसऱ्याला खूष करण्यासाठी, स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी असत्य बोलून वाणीचे पावित्र्य नष्ट करू नये.
      आपल्या पुतण्यांना उपदेश करताना देखील समर्थ सांगतात की,
                बरे सत्य बोला यथातथ्य चला | बहु मानिती लोक तेणे तुम्हाला |
                धरा बुद्धि पोटी विवेके मुले हो | बारा गुण तो अंतरामाजी राहो ||

सत्यवचन, प्रामाणिकपणा या दोन्ही गोष्टीना जर आपल्या जीवनात महत्व असेल तर आपल्याला कशाचे भय वाटत नाही. असत्य हे लंगडे असते. एखादी खोटी गोष्ट खरी आहे हे सांगण्यासाठी अनेक खोट्या गोष्टींचा आधार घ्यावा लागतो. या खोटेपणामुळे मनावर नकळत एक ताण आलेला असतो. नेमके खोटे काय बोललो होतो हे आठवावे लागते आणि त्याचेच दडपण मनावर सतत असते. याशिवाय आपला खोटेपणा झाकण्यासाठी माणूस आपले खोटे विचार जोरजोरात आक्रस्ताळेपणाने मांडतो. त्याच्या या वागण्याने तात्पुरता जरी लोकांवर प्रभाव पडला तरी त्याचा खोटेपणा कालांतराने उघडा पडतो. उत्तम व्यक्तिमत्व घडण्यासाठी या अवगुणापासून दूर राहण्यास समर्थ सांगत आहेत......क्रमशः 

                            || जय जय रघुवीर समर्थ ||

No comments:

Post a Comment