Wednesday, January 13, 2016

८. अवगुण सोडिता जाती | उत्तम गुण अभ्यासिता येती |

                                     || श्रीराम ||

|| समर्थ वाणी ||

८. अवगुण सोडिता जाती | उत्तम गुण अभ्यासिता येती |
   
            अवगुण सोडिता जाती | उत्तम गुण अभ्यासिता येती |
            कुविद्या सांडून सिकती | शहाणे विद्या || १४/६/५ ||

हे दासबोधाचे प्रधान सूत्र आहे. अचूक प्रयत्नांच्या आधारे कोणीही आपल्यामध्ये हवा तसा बदल घडवू शकतो हा समर्थांचा विश्वास आहे. सुधारणा नेहमी दुसऱ्याने करावी अशी सर्वसामान्य माणसाची इच्छा असते. परंतु बदल करावयाचा असेल तर त्याची सुरवात स्वत:पासून करावी. तसेच स्वत:मध्ये बदल घडवून दुसऱ्यामध्ये तसाच चांगला बदल घडवून आणावा याविषयी समर्थ मार्गदर्शन करतात.

      चातुर्य लक्षण या समासामधून समर्थांनी आत्मपरीक्षण करून प्रयत्नपूर्वक स्वत:मधील दोषांचा त्याग करण्यास सांगितले आहे. प्रत्येकाने स्वप्रयत्नाने आपल्यामधील गुणांचा विकास करून आपले व्यक्तिमत्व प्रभावशाली बनवावे असे समर्थांचे सांगणे आहे. हा विषय अधिक सहजतेने कळावा यासाठी समर्थ समासाच्या प्रारंभीच सांगतात की मनुष्याला प्राप्त झालेले रूप आणि सौंदर्य हे गुण अभ्यासाने प्राप्त होत नाहीत तर या गोष्टी माणसाला वंश परंपरेने लाभलेले असते. त्यामध्ये बदल करायचा म्हंटले तर बदल करता येत नाही पण अवगुण सोडायचे म्हंटले तर सोडता येतात आणि उत्तम गुण अभ्यासपूर्वक मिळवता येतात. अवगुणाचा त्याग करून माणसाने सद्गुणी बनावे आणि आपले अंतरंग चातुर्याने संपन्न करावे, समाजात मोठेपण मिळवावे असे समर्थांचे सांगणे आहे. त्यासाठी दृढनिश्चय, सातत्य याची आवश्यकता असते. परंतु प्रत्यक्षात घडते वेगळेच माणसाला आपले अवगुण हे अवगुण न वाटता गुणच वाटू लागतात. समर्थ म्हणतात,

            सकाळ अवगुणामध्ये अवगुण | आपले अवगुण वाटती गुण |
            मोठे पाप करंटपण | चुकेना की || १९/८/८||

आपले अवगुण गुण वाटणे हा माणसाच्या अंगी असणाऱ्या अवगुणामधील मोठा अवगुण आहे असे समर्थ म्हणतात. हे मोठे पाप आहे त्यामुळे माणसाचा करंटेपणा चुकत नाही. अशा करंट्याचा आणखी एक दोष म्हणजे,

            आपले झाकी अवगुण | पुढिलासं बोले कठीण | 
            मिथ्या गुणदोषेविण | गुणदोष लावी || ५/३/९२||

तो आपले अवगुण झाकून ठेवतो पण दुसऱ्यांना त्यांच्या दोषांबद्दल कठीण शब्द बोलतो, ज्याच्या अंगी जे गुणदोष नसतात ते तो खोटेपणाने त्यांच्यावर लादतो. समर्थ म्हणतात अशा व्यक्तींना भगवंत भेटत नाही किंबहूना अशा मदोन्मत्त माणसांची बुद्धी भगवंताकडे कधीच वळत नाही. म्हणून वेळीच सावध हो आणि अवगुणांचा त्याग कर,
          अवगुण अवघेची सांडावे | उत्तमगुण अभ्यासावे | 
          प्रबंद पाठ करीत जावे | जाड अर्थ || १८/३/१३||

....क्रमशः


                          जय जय रघुवीर समर्थ 

No comments:

Post a Comment