Saturday, May 5, 2018

उत्तम संगतीचे फळ सुख | अद्धम संगतीचे फळ दु:ख |

२९ उत्तम संगतीचे फळ सुख | अद्धम संगतीचे फळ दु:ख |

    आनंद सांडुनिया शोक | कैचा घ्यावा || १७/७/१७||

मानवी जीवनामध्ये, व्यवहारामध्ये काय किंवा परमार्थामध्ये काय व्यक्तीविकासाच्या जडण घडणीमध्ये संगतीला अत्यंत महत्त्व आहे. संगतीमुळे एक तर प्रगती किंवा अधोगती प्राप्त होते हे लक्षात ठेवून उत्तम संगतीचा आग्रह माणसाने धरावा. सत्संगात राहून माणसाने स्व:ताचे मित्र बनून रहावे. आपल्याला कोणाची संगत आहे यावरून आपल्या आयुष्याला निश्चितच कलाटणी मिळते. व्यवहारामध्ये जर उत्तम संगत असेल तर आपल्यातील चांगुलपणाची धार अधिक तीव्र होते. पण एखादी वाईट विचारांची किंवा नकारात्मक विचारांची व्यक्ती आपल्या संपर्कात असेल, त्याला जर काही वाईट सवयी असतील तर आपले मन लगेच विचलित होते. मानवी स्वभावातील एक महत्त्वाचा दोष असा आहे की त्याला वाईट सवयी लगेच लागतात पण उत्तम सवयीसाठी मात्र त्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. जसे पहाटे उठणे, रोज व्यायाम करणे अशा अनेक सवयी सांगता येतील. खरतर आपल्या उत्तम सवयीनां वाईट सवयी बाहेरून येऊन चिकटतात. पण कालांतराने आपल्याला त्याच अधिक योग्य आणि चांगल्या वाटू लागतात. कोणतेही व्यसन जन्माला आल्यापासून लागलेले नसते. तर कोणाचे तरी बघून, काही तरी वेगळे करून बघण्याच्या बहाण्याने केवळ आकर्षण म्हणून व्यक्ती त्या सवयीकडे वळते. नंतर त्यागोष्टीच्या तो इतकी आधिन होते की त्यामध्ये काही गैर आहे असे त्याला वाटेनासे होते. हे झाले बाह्य सवयीचें. संत आम्हाला विकारांचा त्याग करावयास सांगतात. वरील ओवीमध्ये उत्तम संगतीने सुख मिळते हे ठाऊक असताना देखील आनंदाचा अव्हेर करून दु:ख  पत्करणाऱ्या अविवेकी माणसांना समर्थ सत्संगाचे महत्त्व समजावून सांगतात.

नारद भक्तिसूत्रामध्ये ४३ व्या सूत्रात “ दुसंग: सर्वथा त्याज्य: ” हे सूत्र आले आहे. दु:संगाचा अंतर्बाह्य त्याग करता येणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण हा संग जीवाला सत्संगापासून परावृत्त करतो. मुळात शुद्ध असणारा आत्मा देहाच्या संगतीत आल्यानंतर त्याची काय अवस्था होते हे समर्थ १७ व्या दशकामध्ये पाण्याचा दृष्टांत देऊन स्पष्ट करतात. पाणी हे मुळात स्वच्छ असते पण अनेक प्रकारच्या वेळी वनस्पतींमध्ये ते शिरते आणि त्यांच्या संगतीचा दोष लागून ते आंबट, तिखट, कडू बनते. तसेच आत्मा हा मुळात शुद्धच असतो पण त्याला देहाची संगत लागली की त्याचे शुद्धपण लोपते आणि त्याच्यामध्ये विकार उत्पन्न होतात. हे विकार जर नष्ट करावयाचे असतील तर त्यांची आई जी “आसक्ती” तिलाच मारले तर तिची सर्व पिल्ले आपोआप मरून जातात असे समर्थांचे सांगणे आहे. परंतु यासाठी उत्तम संगतीची आवश्यकता आहे.

चांडाळा संगती होईजे चांडाळ | होय पुण्यशीळ साधुसंगे | १ |
कुरुंद संगती झिजला चंदन | कुसंगे जीवन नासतासे | २ |
दुर्जन संगती सज्जन ढासळे | क्रोध हा प्रबळे अकस्मात | ३ |
दास म्हणे संग त्यागा दुर्जनांचा | धारा सज्जनाचा आदरेसी | ४ |

या सृष्टीतील विवेकी लोकांची सांगत प्रत्येकाने धरावी असा समर्थांचा आग्रह आहे.  संगत नेहमी अशाच माणसांची धरावी ज्याच्या संगतीत आपले अंतरंग पालटते. सत्संगती लाभणे ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. आणि ती टिकणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे…….