Sunday, January 3, 2016

१ समर्थांचे गणेश स्तवन :

                                                                            ||श्रीराम ||

|| समर्थवाणी ||

१ समर्थांचे गणेश स्तवन :
        संत वाड्मयामध्ये स्तवनाला अत्यंत महत्व आहे. समर्थांनी आपल्या ग्रंथराज दासबोधामध्ये पहिला संपुर्ण दशक स्तवनाला वाहिलेला आहे. या स्तवनामधून समर्थांचा नम्रभाव प्रकट होतो. यामधून श्रीगणेश, शारदामाता, सद्गुरू, संतसज्जन यासर्वांची कृपा आपल्यावर झाली याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. अफाट प्रतिभा तसेच सूक्ष्म बुद्धिमत्ता लाभलेले समर्थ या ग्रंथाचे सारे श्रेय यासर्वाना देतात.
        महाराष्ट्रामध्ये अनेक दैवते आहेत त्यापैकी श्रीगणेशाच्या उपासनेला विशेष महत्व दिले जाते. श्रीगणपती अथर्वशीर्ष, श्रीगणेश कवच, श्रीगणेश सूक्त, अशा विविध माध्यमातून त्याची उपासना केली जाते. गणपती हा गजानन, विनायक, एकदंत, लंबोदर अशा अनेक नावांनी ओळखला जातो. विघ्नांचा नाश करणारा हा विघ्नहर्ता विद्येची देवता म्हणून सर्वश्रेष्ठ मानला जातो. गणपतीच्या उपासनेने अज्ञान नाहिसे होऊन बुद्धी प्राप्त होते. सर्वत्र त्याची निष्ठेने पूजा केली जाते. सर्व सिद्धीचे फळ देणारा, अज्ञानाचे पटल दूर करून भ्रम नाहीसे करणाऱ्या गणेशाचे स्तवन समर्थ पहिल्या दशकात करतात,
ओम नमो जी गणनायेका | सर्वसिद्धी फळदायेका | अज्ञानभ्रांती छेदका | बोधरूपा |
माझिये अंतरी भरावे | सर्वकाळ वास्तव्य करावे | मज वाग्सुन्यास वदवावे | कृपाकटाक्षे करुनी || दासबोध      
        समर्थ गणेशाला वंदन करून त्याची कृपा संपादन करून घेतात. मनामध्ये एखाद्या गोष्टीचे अनुमान करून त्याचा अर्थ लक्षात घेऊन निर्णय घेतला जातो. यामध्ये ह्या अर्थाचे आकलन होण्यास मनुष्याला ज्ञानस्वरूप गणेशाची कृपा असणे आवश्यक असते. कारण त्याच्याच सत्तेने बुद्धीमध्ये स्फूर्ति निर्माण होते. या गणेशाची कृपा प्राप्त झाल्याने काय होते? समर्थ म्हणतात,
                                      तैसी मंगळमूर्ती आद्या | पासूनि जाल्या सकळ विद्या |
                                      तेणे कवी लाघव गद्या | सत्पात्रे जाले || दा.१७/१/३ ||
मंगलमूर्ती सर्व विद्यांचे मूळ आरंभस्थान आहे. त्याच्यापासून सर्व विद्या उत्पन्न होतात. त्याच्या कृपेने काही साधक उत्तम भव्य गद्य पद्यरचना करू शकतात आणि मोठ्या योग्यतेस चढतात. असा हा सर्व कर्तृत्वाचा उगम असणारा मूळ पुरुष श्रीगणेश, अज्ञान नाहीसे करून शुद्ध ज्ञानाची प्राप्ती करून देणारा श्रीगणेश,                      साधनेमध्ये अनेक विघ्ने निर्माण झाली तर त्याचा नाश करणारा असा हा विघ्नहर्ता श्रीगणेश. चौदाविद्यांचा स्वामी असणाऱ्या अशा या श्रीगणेशाला समर्थांनी वारंवार वंदन केले आहे. श्रीगणेशाच्या कृपादृष्टीने या सामर्थ्याचा योग्य तो उपयोग केला जावा या बुद्धीला विवेकाचे अधिष्ठान लाभावे अशीच प्रार्थना समर्थ या नमनाद्वारे करताना दिसतात....  क्रमशः

madhavimahajan17@gmail.com

जय  जय रघुवीर समर्थ 

No comments:

Post a Comment