Thursday, February 25, 2016

२१. काममगरमिठी सुटेना | तिरस्कार लागला तुटेना |

|| समर्थ वाणी ||

२१. काममगरमिठी सुटेना | तिरस्कार लागला तुटेना |

           काममगरमिठी सुटेना | तिरस्कार लागला तुटेना |
           मद मत्सर वोहटेना | भूलि पडिली || ३/१०/४||

          समर्थांनी संसाराला महापुराची उपमा दिली आहे. या महापुरात अनेक विकार भुलवत असतात. त्यात कामवासना फार वाईट म्हणून तिची मगरमिठी असा समर्थ उल्लेख करतात. कामवासनेची मगरमिठी सुटत नाही, कामवासना मनातून जात नाही. मद मत्सर हे विकार कमी होत नाही, माणूस एक प्रकारच्या मोहित अवस्थेत असतो.
          जेथे काम आहे तेथे क्रोध हा स्वाभाविक येतोच. व्यक्तीच्या मनामध्ये अनेक विषयांचा भोग घ्यावा ही लालसा नेहमीच जागरूक असते. मग ही लालसा देहभोगा विषयी असो अथवा इतर इंद्रियतृप्ती विषयीची असो. कोणत्याही विषयभोगाची लालसा माणसाचा सर्वनाशाच करते. कामवासना या विकारामध्ये शृंगाराचे पावित्र्य न येता यामध्ये स्त्री पुरुष एवढीच दृष्टी असते. यामध्ये पावित्र्य, एकात्म भाव-जीवन या व्यापक विचाराना थारा नसतो. मग या विकारातूनच लहान वयातील मुलींपासून उतार वयातील स्त्रीयांपर्यंत अनेक जाणीवर बलात्कार झाल्याचे वृत्त आपल्या कानावर येते. तरुण तरुणींवर याचा इतका प्रभाव असतो की उघड्यावर कोणतीही गोष्ट करण्यात त्यांना गैर वाटत नाही. हल्ली पशुप्रमाणे केवळ नरमाद्यांचे उघड्यावर मिलन हे मानव समाजातील प्रदूषणच म्हणावे लागेल. लोकांना न भय, न लज्जा त्यामुळे अनाथालायांची वाढ होत आहे , नको त्या रोगांना सामोरे जावे लागत आहे.
            रजोगुणापासून निर्माण होणारे हे विकार आपल्या मनावर साम्राज्य गाजवतात पण आपल्याविषयी त्यांच्या मनात दया उत्पन्न होत नाही . आपल्या आणि इतरांच्या नाशाला कारणीभूत ठरणाऱ्या या विकारापासून दूर राहण्यास समर्थ आपल्याला सांगतात.  यामध्ये यश येण्यासाठी मनावर संयम, प्रयत्नपूर्वक साधना, या माध्यमातून मन स्थिर होणे आवश्यक आहे. यासाठीच सत्पुरुषांचा सहवास, कल्याणकारी शास्त्रांचा अभ्यास आणि सद्गुरूंचा आशीर्वाद याचा लाभ व्हावा लागतो.....क्रमशः

|| जय जय रघुवीर समर्थ ||

Wednesday, February 24, 2016

२०. कामक्रोधे लिथाडिला | तो कैसा म्हणावा भला |

|| समर्थ वाणी ||

२०. कामक्रोधे लिथाडिला | तो कैसा म्हणावा भला |

कामक्रोधे लिथाडिला | तो कैसा म्हणावा भला |
अमृत सेविताच पावला | मृत्य राहो || १/१/२५ ||

कामक्रोधाने बरबटलेला माणूस चांगला असूच शकत नाही असे समर्थांचे मत आहे. काम,क्रोध,लोभ ही नरकाची तीन द्वारे जी आत्म्याचा नाश करतात म्हणूनच त्याचा त्याग करावा याविषयीचे मार्गदर्शन भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये केले आहे. आजच्या २१ व्या शतकात माणसाने आपले जीवन सुखी होण्यासाठी अनेक क्षेत्रात प्रगती केलेली दिसते. आपल्या देहाला कमीत कमी कष्ट देऊन जास्तीत जास्त सुखी कसे राहता येईल या दृष्टीने तो सतत प्रयत्नशील असलेला आढळतो. ह्या बाह्यसजावटी बरोबर आपले मन देखील सुदृढ असावे याकडे मात्र त्याचे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले दिसते. या भोगावादी जगात यांत्रिक विकासाला जेव्हढे प्राधान्य दिले जाते तेव्हढेच मानसिक विकासाकडे दुर्लक्ष होत आहे. सततची जीवघेणी स्पर्धा माणसाच्या मनातील या विकारांना खतपाणी घालत असल्याने या विकारांचा विकास अधिकाधिक होताना दिसतो. या षडविकाराच्या प्रभावाने माणसातील माणूसपण हरवत चालले आहे.
            मनामध्ये निर्माण होणारी एक इच्छा कामक्रोधा बरोबर आशा, तृष्णा, दंभ, अहंकार या विकाराना घेऊन येते आणि आपला सर्वनाश करते. साधूसंत , देव ब्राम्हादिकाना देखील न सोडणारे हे विकार आहेत. यासाठीच समर्थ आपल्याला सतत सावध राहण्याची सूचना करतात. अर्जुन हा आपणा सर्वांचे प्रतिक आहे. त्याच्यासारखी संभ्रमित अवस्था आपली देखील झालेली आहे. यासाठीच या दोषांचा नाश करून आपण आपले जीवन कृतार्थ करून घ्यावे याचे मार्गदर्शन भगवंतांनी केले आहे.......क्रमशः


|| जय जय रघुवीर समर्थ ||

Tuesday, February 23, 2016

१९. दंभ दर्प अभिमान | क्रोध आणि कठीण वचन |

|| समर्थ वाणी ||

१९. दंभ दर्प अभिमान | क्रोध आणि कठीण वचन |

दंभ दर्प अभिमान | क्रोध आणि कठीण वचन |
हे अज्ञानाचे लक्षण | भगवद्गीतेत बोलिले || १२/१०/२८||

            भगवदगीतेमध्ये भगवंतानी नरकाची जी तीन द्वारे सांगितली आहेत त्यापैकी क्रोध हा एक आहे. क्रोधाने स्वत:चा तसेच इतरांचा देखील नाश करणारी अनेक उदाहरणे आपण समाजात पहातो. स्वत:बरोबर इतरांचा नाश करणाऱ्या क्रोधावर विजय मिळवण्यास समर्थ सांगतात. क्रोध हा असा विकार आहे की तो येताना आपले इतर बांधव म्हणजेच मद, मत्सर, दंभ यांना देखील आपल्याबरोबर घेऊन येतो. माउलींनी या विकारांना ‘विषयदरीचे वाघ’ असे संबोधले आहे. या विकारांचे वैशिष्ट्य हे की ते येताना पाहुणे म्हणून येतात आणि नंतर मात्र आपणच त्यांच्या इतके आहारी जातो की त्यांचे गुलामच बनतो. यासाठी समर्थ आपल्याला वेळेत सावध होण्याचा इशारा देतात.

            ‘उत्तमपुरुष निरुपण’ या समासामध्ये समर्थांनी दंभ, दर्प, अभिमान, क्रोध आणि कठोर वाणी ही अज्ञानाची लक्षणे असल्याचे सांगितले आहे. तसेच अठराव्या दशकातील सहाव्या समासामध्ये तोंडाळ, कठोर वचनी, शीघ्रकोपी माणसाला समर्थांनी ‘राक्षस’ म्हणून संबोधले आहे. ‘दंभ’ हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. सर्व दुर्गुणांचा हा राजा आहे. म्हणूनच भगवदगीतेत असुरी संपत्तीचे वर्णन करताना दंभ या दुर्गुणाला मानाचे स्थान दिले आहे.(१६/४)
           
            दंभ याला इंग्रजी मध्ये हायपोक्रसी हा शब्द आहे. याचा अर्थ नाटकीपण, देखावा, बाह्य डामडौल, उर्मटपणा, कठोरपणा, अज्ञान ही सर्व असुरी प्रवृत्तीत जन्मलेल्याची लक्षणे आहेत. समर्थांना सर्वात जास्त चीड या अनैतिक दुर्गुणाची आहे. यासाठीच उत्तम महंत होण्यासाठी महंत व्हा पण महंती करू नका असे समर्थ आपल्या शिष्यांना बजावतात. खोटा डामडौल आला की दंभ हा आलाच म्हणून समर्थांना महंतीचा तिटकारा आहे. हा विकार नसेल तर मनातले विचार आणि आचार याचा मेळ जमेल . विकारांवर विजय मिळवता आला तर मन:शांती लाभणे शक्य आहे.......क्रमशः


|| जय जय रघुवीर समर्थ || 

Monday, February 22, 2016

१८. अवगुण अवघेची सांडावे | उत्तम गुण अभ्यासावे |

|| समर्थ वाणी ||

१८. अवगुण अवघेची सांडावे | उत्तम गुण अभ्यासावे |

अवगुण अवघेची सांडावे | उत्तम गुण अभ्यासावे |
प्रबंद पाठ करीत जावे | जाड अर्थ || १८/३/१३||

अवगुण सोडावे म्हंटले तर सुटत नाहीत. त्याचाच लळा माणसाला अधिक लागतो. परंतु दृढनिश्चय, सातत्य आणि चिकाटी यामुळे अवगुण सोडता येऊ शकतात आणि उत्तम गुणांचा अभ्यास केला तर उत्तम गुण आपल्या अंतरंगात उतरतात हा विश्वास समर्थ आपल्याला देतात. जो माणूस विवेकाने आपले अंतरंग सजवतो तो सर्वांना सुखी करतो. अज्ञानी माणसाला मात्र स्वत:चे हित कळत नाही. तो स्नेह राखत नाही, उगाच सर्वांशी वैर करतो. उत्तम गुण अभ्यासताना सर्व प्रथम सर्वांशी स्नेह वाढवावा, आपले बोलणे सुधारावे, जगमित्र व्हावे.
हा प्रयत्न करत असताना सर्व प्रथम माणसाने षड्रिपूवर विजय मिळवणे आवश्यक आहे. या रिपुंमधील क्रोध हा सर्व नाशाला कारणीभूत ठरणारा विकार आहे. ज्यापासून कोसो लांब राहण्याची सूचना समर्थ आपल्याला करतात. हा विकार आपल्याला त्रासदायक ठरतोच पण दुसऱ्या व्यक्तीच्या दु:खाला देखील कारणीभूत ठरतो. हा क्रोध कसा बळावतो तर,

अभिमाने उठे मत्सर | मत्सरे ये तिरस्कार | पुढे क्रोधाचा विकार | प्रबळ बळे || १/१/२३ ||

विचार शक्ती नष्ट करणार, स्वत:बरोबर इतरांचा नाश करणाऱ्या क्रोधावर विजय मिळवण्यासाठीच समर्थ उत्तम गुण अभ्यासण्यास सांगतात. कारण या क्रोधाचे अनेक दु:ष्परिणाम शरीरावर, मनावर, बुद्धीवर होतात. भगवद गीतेत भगवंतांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, “ क्रोधामुळे भ्रम होतो, विवेक सुटतो, भ्रमामुळे तसेच अविवेकाने विस्मरण होते, विस्मरणाने निश्चयात्मक बुद्धी नष्ट होते, आणि बुद्धिनाश झाला विवेकाचा नाश झाला की सर्वस्वाचा नाश होतो” ( अ.२ श्लो. ६३ ) म्हणून क्रोधासारीखा अवगुण अवघाची सांडावा.....क्रमशः


|| जय जय रघुवीर समर्थ ||

Sunday, February 21, 2016

१७. धन्य धन्य हा नरदेहो | येथील अपूर्वता पाहो |

|| समर्थ वाणी ||

१७. धन्य धन्य हा नरदेहो | येथील अपूर्वता पाहो |

धन्य धन्य हा नरदेहो | येथील अपूर्वता पाहो |
जो जो कीजे परमार्थ लाहो | तो तो पावे सिद्धीते|| १/१०/१||

            समर्थांनी नरदेह स्तवनातील समासामध्ये नरदेहाचा या शब्दात गौरव केला आहे. मानवाला प्राप्त झालेल्या या नरदेहाचा माध्यम म्हणून उपयोग करून घेऊन जीवाने आपल्या जन्माचे सार्थक करावे ,आनंदी आणि यशस्वी जीवन जगावे यासाठी समर्थ मार्गदर्शन करतात. समर्थ हे शक्तीचे उपासक आहेत. शक्तीला महत्व देताना केवळ शाररीक शक्तिलाच महत्व न देता मानसिक, वैचारिक, आर्थिक, अध्यात्मिक अशा सर्व ज्ञात तसेच अज्ञात शक्तीला महत्व देतात. आपल्याला प्राप्त झालेला नरदेह ही आमची खरी ताकद आहे. जगाच्या पाठीवर अनेक प्राणी आहेत. पण यामध्ये मनुष्य प्राणी हा असा आहे की त्याला प्राप्त झालेला देह हा अनेक शक्तींनी युक्त आहे. या प्राप्त झालेल्या सामर्थ्याचा त्याने योग्य उपयोग करून घेतला पाहिजे.  
   
         सर्व प्रथम आपल्याला प्राप्त झालेल्या या देहाची काळजी घेणे महत्वाचे आहे.यासाठीच समर्थांनी आपल्या आयुष्यात बलोपासनेला महत्व दिले. स्वत: समर्थ रोज १२०० सूर्यनमस्कार घालत असत. त्यांनी आपल्या कृतीतून बलोपासनेची दीक्षा देऊन सर्वांना बलसंपन्न होण्याची प्रेरणा दिली. बलोपासने बरोबर मनाचे सामर्थ्य ओळखून मनाला योग्य संगतीत ठेवून त्याला योग्य वळण लावावे याची मार्गदर्शन केले. माणसाला मनन, चिंतन करण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. उत्तम देहाच्या आणि उत्तम सकारात्मक विचाराच्या सहाय्याने मानवाने आपले जीवन विकसित करून घ्यावे. या दोन्हीला जर विवेकाची जोड दिली तर या देहाचे निश्चितच सार्थक होईल हा समर्थांना विश्वास आहे. या देहाला आणि मनाला जे वळण लावणार आहोत तसेच आपले आयुष्य घडणार आहे. या दोन्हीच्या माध्यमातून जो जो प्रयत्न करणार आहोत तो यशस्वीच होणार आहे. प्रत्येक जीवाचे अंतिम ध्येय परमार्थ प्राप्ती हेच असावे तरच खरा आनंद आणि समाधान प्राप्त होणार आहे हे याची जाणिव त्यांनी करून दिली आहे........क्रमशः


|| जय जय रघुवीर समर्थ ||

Saturday, February 20, 2016

१६. शरीर परोपकारी लावावे | बहुतांच्या कार्यास यावे |

|| समर्थ वाणी ||

१६.  शरीर परोपकारी लावावे | बहुतांच्या कार्यास यावे |

शरीर परोपकारी लावावे | बहुतांच्या कार्यास यावे |
उणे पासो नेदावे | कोणियेकाचे || १२/१०/५||

            उत्तम पुरुष निरुपण या समासामध्ये समर्थांनी संघटनेच्या दृष्टीने महंतामध्ये कोणते उत्तमगुण असावेत याचे अचूक मार्गदर्शन केले आहे.  आपले शरीर परोपकारामध्ये झिजवावे. पुष्कळ लोकांची कामे करून द्यावी. कोणालाही उणे पडू देऊ नये असे समर्थांचे सांगणे आहे. मदत करताना हा आपला, हा परका हा भाव मनामध्ये नसावा. जो गांजला असेल त्याचे दु:ख जाणून घेऊन आपल्याला शक्य असेल तितकी त्याला मदत करावी. आपल्या माणसांसाठी, घरासाठी आपण काही करतच असतो. पण थोडे परिघाबाहेरच्या लोकांसाठी निरपेक्षवृत्तीने मदत करणे हा झाला परोपकार. हा परोपकार करताना तुमच्यावर कोणी उपकार केले तर ते जरूर स्मरणात ठेवावेत, पण जर तुम्ही कोणावर उपकार केलेत तर मात्र त्याचे विस्मरण व्हावे अशी वृत्ती असावी.

            परोपकार करताना आपला अहंकार वाढणार नाही आणि दुसरी व्यक्ती लाचार होणार नाही या दोन्हीची सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. परोपकार डोळसपणे केला तर तो अधिक आनंददायी ठरतो. आपल्या इतरांना मदत करण्याच्या वृत्तीमुळे पुढील व्यक्ती परावलंबी होणार नाही ना, याचा विवेक जागृत हवा. आपण केलेल्या या सत्कर्माने पुढील व्यक्ती स्वावलंबी बनली पाहिजे हा विचार महत्वाचा. एक चीनी म्हण आहे, ‘ तुम्ही गरीब माणसाला मासा देऊन त्याच्या एक वेळच्या जेवणाची सोय करता. पण त्याला ‘गळ’ देऊन मात्र तुम्ही त्याला आयुष्यभर पोटभरीचे साधन देता........क्रमशः


|| जय जय रघुवीर समर्थ ||

Friday, February 19, 2016

१५. नरदेह परम दुल्लभ | येणे घडे अलभ्य लाभ |

|| समर्थ वाणी ||

१५. नरदेह परम दुल्लभ | येणे घडे अलभ्य लाभ |

नरदेह परम दुल्लभ | येणे घडे अलभ्य लाभ |
दुल्लभ ते सुल्लभ | होत आहे || २०/५/२५||

            मानवी देह अत्यंत दुर्लभ आहे. इतर देह रसहीन आहेत, नुसते कष्टकारक आहते . पण मानवी देह म्हणजे फार मोठे घबाड आहे त्याचा फायदा मोठ्या विवेकाने करून घेतला पाहिजे असे समर्थांचे सांगणे आहे. उत्तम नरदेह प्राप्त झाल्यानंतर त्याचा योग्य उपयोग करून जर उत्तम आयुष्य जगता आले नाही तर ते जीवन व्यर्थ आहे. मानवी देह प्राप्त होऊन देखील आळसामध्ये जो आयुष्य जगतो तो सर्व बाजूनी बुडतो त्याचे केवळ नुकसानच होते.

            समाजामध्ये आपल्याला अशा काही व्यक्ती दिसतात ज्या दैवावर हवाला ठेवून निष्क्रिय जीवन जगत असतात. स्वत: काही प्रयत्न न करता आळसात दिवस काढतात. एकदा का हा आळस अंगात शिरला की हा आळस माणसाला निष्क्रिय बनवतो. देहाला जेव्हढे म्हणून सुखात ठेवता येईल या साठी सतत धडपडत राहतो. अत्यंत निरुत्साही, कमीत कमी हालचाली करणारा आळशी माणूस समर्थांना मनापासुन आवडत नाही. अशा आळशी माणसांचा समर्थ धिक्कार करतात. पण त्याचा अव्हेर करत नाहीत तर त्याला त्याने कोणते अचूक प्रयत्न करावेत याचे मार्गदर्शन करतात.

            बाराव्या दशकात समर्थ एका करंट्याचा दृष्टांत देतात. अत्यंत दुर्दैवी आणि आळशी अशा दुबळ्या माणसाच्या मागे संकटे कशी हात धुऊन मागे लागतात याविषयीचे वर्णन या दृष्टांतामध्ये आले आहे.  आळशी वृत्तीने त्याने स्वत:चे नुकसान करून घेतले आहे अशा या करंट्याला समर्थ मार्गदर्शन करतात. समर्थ अशा माणसाला कोणतीही गोष्ट प्रयत्न केल्याशिवाय सहज साध्या होत नाही हा मानवी जीवनाचा नियम समजावून सांगतात. ‘केल्याने होत आहे रे’ हे सूत्र सांगून समर्थ त्याला सावधपणे आळशी पण सोडण्यास सांगतात. याठिकाणी सावधपणा यासाठी कारण जुन्या सवयी लगेचच जडू शकतात. म्हणून चिकाटीने आणि सातत्याने आळशीपणा हा दोष मुळासकट नष्ट करण्याचे मार्गदर्शन करतात. पहाटे उठावे, काही पाठांतर करावे, वायफळ बडबड सोडून द्यावी. आपल्या प्रत्येक कृतीमध्ये अचूकता आणण्याचा प्रयत्न करावा, कोणाचे अंतकरण दुखवू नये, गोड बोलावे पण या गोड बोलण्यात ‘मुह मे राम बगल मे छुरी’ असा प्रकार नसावा. यामध्ये दुसऱ्याच्या हिताचाच असावा. उत्तम ग्रंथांचे वाचन करावे , सतत उत्तमाच्या संगतीत राहावे. या सर्वातून आपोआपच आपल्यातील दोष नाश पावतात........क्रमशः

|| जय जय रघुवीर समर्थ || 

Thursday, February 18, 2016

१४. धटासी आणावा धट | उद्धटासी पाहिजे उद्धट |


|| समर्थ वाणी ||

१४. धटासी आणावा धट | उद्धटासी पाहिजे उद्धट |

            अध्यात्मशास्त्र आम्हाला दुबळे बनवते , सतत नम्रता शिकवते असा तक्रारीचा सूर आपला असतो. हे शास्त्र नेमके काय सांगते हे नीट न समजल्यामुळे या शिकवणी विषयी अनेक प्रश्न मनात उभे राहतात. जसे सतत नम्र राहायचे तर मग जर कोणी दुर्जन किंवा दुष्ट समोर आला तर त्यांना प्रतिकार करावयाचा नाही का ? जो अन्याय ते करतात तो सहन करायचा का ? परंतु हे शास्त्र नीट समजून घेतले तर या भौतिक जगात नेमके कसे जगावे , कोणत्या प्रसंगी कसे वागावे याचे अचूक मार्गदर्शन केले गेले आहे.
           
               समर्थांनी अनेक ठिकाणी सतत सावधपणे कसे वागावे याचे मार्गदर्शन केलेच आहे तसेच दासबोधातील ‘राजकारण निरुपण’ या १९ व्या दशकातील नवव्या समासात समर्थ चतुरपणे, धूर्तपणाने कसे वागावे याचे मार्गदर्शन करतात.  या समासामध्ये समर्थ स्पष्टपणे सांगतात की दुष्ट आणि दुर्जनांच्या भयाने आपले कार्य विस्कळीत होऊ देऊ नये. त्याना योग्य पद्धतीने शह द्यावा. लोकसंग्रह करताना नाना प्रकारच्या व्यक्ती भेटत असतात. त्यातील दुर्जन व्यक्ती ओळखून ठेवाव्यात पण त्यांना सर्वामध्ये प्रगट करू नये अशी सूचना देखील देतात. कारण अशा व्यक्ती आपल्या कार्यात कटकटी करत राहतात म्हणून समर्थ आपल्याला सावध करतात. एखादी दुर्जन व्यक्ती त्याचामधील वाईट गुणांमुळे परिचित असेल तर अशा व्यक्तीना एकदम दूर न लोटता त्यांना जवळ करून त्यांच्या वृत्तीतील दुर्जनाचा समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यास समर्थ सांगतात. त्यांचातील दोष सतत दाखवून दिले तर कटूता वाढते म्हणून मृदू बोलण्याने, क्षमाशील वृत्तीने त्या व्यक्तीचे मन बदलावे . त्याच्यातील वाईट वृत्तीचा नाश करावा. तरीही यश मिळाले नाही तर मात्र ,  

हुंब्यासी हुंबा लाउनी द्यावा | टोणप्यास  टोणपा आणावा |
लौदास पुढे उभा करावा | दुसरा लौद || १९/९/२९||

धटासी आणावा धट | उद्धटासी पाहिजे उद्धट |
खटनटासी खटनट | अगत्य करी || १९/९/३०||

समाजातील गुंडगिरी साफ मोडून काढावी, अन्यायाचा प्रतिकार करावा ही समर्थांची शिकवण आहे. वाईट व्यक्तीच्या नाशापेक्षा वाईट वृत्तीच्या नाशाला त्यांनी  अधिक प्राधान्य दिले.....क्रमश:


|| जय जय रघुवीर समर्थ ||

Wednesday, February 17, 2016

१३. मुळी उदक निवळ असते | नाना वल्लीमध्ये जाते |

|| समर्थ वाणी ||

१३. मुळी उदक निवळ असते | नाना वल्लीमध्ये जाते |

मुळी उदक निवळ असते | नाना वल्लीमध्ये जाते |
संगदोषे तैसे होते | आंब्ल तिक्षण कडवट || १७/७/१||

           पाणी मुळातच स्वच्छ असते. अनेक प्रकारच्या वेली, वनस्पतीमध्ये ते शिरते. आणि त्याच्या संगतीचा दोष लागून ते आंबट,तिखट किंवा कडू बनते. संगतीचा परिणाम असा आहे. मुळात आत्मा हा शुद्धच असतो पण त्याला देहाची संगत लागली की त्याचे शुद्धपण लोपते आणि त्यांच्यात विकार उत्पान्न होतात.  माणसामध्ये असणारी आसक्ती ही सर्व विकारांची आई आहे. त्यामुळे या आसक्तीलाच जर मारले तर तिची सर्व पिल्ले आपोआप मरून जातात असे समर्थांचे सांगणे आहे पण त्यासाठी उत्तम संगत असणे महत्वाचे आहे.  ज्याच्या संगतीत अंतरंग पालटते अशा माणसांची नेहमी संगत धरावी. 
           
             या सृष्टीतील विवेकी लोकांची संगत प्रत्येकाने धरावी असा समर्थांचा आग्रह आहे. परंतु सत्संगती लाभणे ही अत्यंत भाग्याची गोष्ट असली तरी ती टिकणे फार महत्वाचे आहे. कारण सामान्य माणसाला विषयोपभोगात अधिक रस असतो. देहाचे चोचले पुरविण्याकडे त्याचा अधिक कल असतो. या विकारांचा संग देखील घातकच. दु:संग हा भक्तीमार्गातला मोठा अडसर आहे.  नारद भक्तीसूत्रातील ४३ व्या सूत्रात  ‘दु:संग सर्वथा त्याज्य:’ हे सांगून सत्संगाचे महत्व स्पष्ट केले आहे. दु:संगाने काय घडते याचे कारण भागवतात कपिल देवहुती यांच्या संवादात पहावयास मिळते. कपिलमुनी म्हणतात, “ दुष्ट संगाने सत्य, पावित्र्य, दया, मननशीलता, बुद्धी, लज्जा, श्री, कीर्ती, क्षमा, मन:शांती, इंद्रिये ताब्यात राहणे आणि ऐश्वर्य इत्यादी सर्व गुणांचा नाश होतो.” म्हणूनच बुद्धीमंतानी दुष्टाच्या संगतीचा त्याग करावा. आणि संताच्या संगतीत राहण्याचा प्रयत्न करावा. यत्नवादाची शिकवण देणारे समर्थ प्रयत्नाची संगत ठेवण्याचे मार्गदर्शन करतात.....क्रमाश:

|| जय जय रघुवीर समर्थ ||

Tuesday, February 16, 2016

१२. सवे लावता सवे पडे | सवे पडता वस्तू आतुडे |

|| समर्थ वाणी ||

१२. सवे लावता सवे पडे | सवे पडता वस्तू आतुडे |

      मनाची चंचलता हा जरी दोष मानला तरीही मनाला आणि देहाला जशी सवय लावावी तसेच वर्तन आपल्याकडून घडते. समर्थ म्हणतात,

सवे लावता सवे पडे | सवे पडता वस्तू आतुडे |
नित्यानित्य विचारे घडे | समाधान || ७/७/१५ ||

मनाकडून ज्याचे सतत चिंतन मनन घडते तसेच ते बनते हा मनाचा मोठ्ठा गुण आहे . मनुष्य प्राण्यामध्ये एक महत्वाचा दोष आहे की त्याला वाईट सवयी लगेच लागतात. खरतर आपल्या मुळातल्या चांगल्या सवयींना या वाईट सवयी बाहेरून येऊन चिकटतात. पण कालांतराने त्याच आम्हाला अगदी चांगल्या आणि जवळच्या वाटतात. यासाठीच अध्यात्मशास्त्रात सत्संगाचे महत्व विषद केले गेले आहे. व्यवहारामध्ये काय किंवा परमार्थात काय व्यक्तीविकासाच्या जडण घडणीत संगतीला अत्यंत महत्व आहे. आपण कोणाच्या संगतीत आहोत यावरून आपल्या आयुष्याला नक्कीच कलाटणी मिळते. व्यवहारामध्ये आपण चांगल्या व्यक्तीच्या सहवासात असू तर आपल्या व्यक्तिमत्वाचा उत्तम विकास होतो त्याचबरोबर आपल्यातील चांगुलपणाची धार अधिक तीव्र होते. पण जर आपली सांगत योग्य नसेल तर त्या व्यक्तीच्या वाईट सवयीनी आपले मन विचलीत होते.

      कोणत्याही व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्तीचे उदाहरण घेतले तर त्याला लागलेले व्यसन हे जन्मजात त्याला लागलेले नसते. कोणाच्या तरी सवयी बघून, काहीतरी वेगळे करण्याच्या बहाण्याने या व्यक्ती या व्यसनांकडे वळतात. पण याचा दुष्परिणाम असा होतो की मन आणि शरीर या व्यसनाच्या इतके आहारी जाते की नंतर परत मागे वळूनही पहात नाही. या व्यसनांची लागलेल्या सवयीमध्ये काही गैर आहे असे त्याला वाटत देखील नाही. आपल्या मनाची अशी अधोगती होऊ नये यासाठी सत्संगाचे महत्व सांगितले गेले आहे. उत्तम संगत, उत्तम सवयी, यासाठी लागणारे सातत्य, चिकाटी यावर समर्थ सतत भर देतात. या उत्तमाचा ध्यास घ्यावा असे समर्थ वारंवार सांगतात. यासाठी उत्तम सांगत महत्वाची आहे. समर्थ म्हणतात,

उत्तम संगतीचे फळ सुख | अधम संगतीचे फळ दु:ख |
आनंद सांडूनिया शोक | कैसा घ्यावा || १७/७/१७||

उत्तम संगतीने सुख मिळते हे ठाऊक असताना देखील आनंदाचा अव्हेर करून दु:ख पत्करणाऱ्या अविवेकी माणसांना समर्थ सत्संगाचे महत्व समजावून सांगतात........क्रमशः


|| जय जय रघुवीर समर्थ ||

Monday, February 15, 2016

११. मन भलतीकडे धावे | ते विवेके आवरावे ||

|| समर्थ वाणी ||

११. मन भलतीकडे धावे | ते विवेके आवरावे ||

      माणसाचे मन चंचल असते. एखाद्या फुलपाखराप्रमाणे ते वेगवेगळ्या विषयांचा विचार करीत असते. कोणत्याही एकाच विषयांवर मन चटकन स्थिर होत नाही. खरेतर मनाचे सामर्थ्य अफाट आहे. त्याची ताकद ओळखूनच समर्थांनी मनाला उपदेश केला आहे. माणसाला विचार करण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. कोणत्याही विषयाचे चिंतन, मनन करण्याचे सामर्थ्य त्याला प्राप्त झाले आहे. मन जरी चंचल असले तरी स्वैरपणे उधळलेल्या मनावर अंकुश असणे तितकेच महत्वाचे आहे. मन मानेल तसे वागण्यापेक्षा विचारपूर्वक तसेच विवेकाने वागणे अत्यंत महत्वाचे आहे. समर्थांनी दासबोधामध्ये सत्वगुणाचे वर्णन करताना म्हटले आहे की,

मन भलतीकडे धावे | ते विवेके आवरावे |
इंद्रिय दमन करावे | तो सत्वगुण ||२|७|७०||

      मन ऐकत नाही, नको त्या गोष्टींच्या मागे धावते, ते विवेकवृत्तीने आवरावे. अचूक प्रयत्न केले तर कोणतीही गोष्ट सहज साध्य होते हा समर्थांचा विश्वास आहे.

      भगवद्गीतेत अर्जुन श्रीकृष्णाला सांगतात की, ‘ हे मन खरोखर चंचल, प्रक्षुब्ध, बलिष्ठ आणि हट्टी आहे. त्याला आवरणे मला वाऱ्याला आवण्याइतके कठीण वाटते” (६/३४) . आपला स्वत:चा अनुभव पहिला तर आपल्याला देखील अर्जुना सारखाच प्रश्न पडला आहे. चंचल आणि अस्थिर मन सतत इकडे तिकडे धाव घेते. ‘ अचपळ मन माझे नावरे आवरीता’ हा अनुभव आपण सातत्याने घेत असतो. भगवंत देखील मान्य करतात की हे मन चंचल असून आवरण्यास कठीण आहे. पण मनावर नियंत्रण ठेवणे ही गोष्ट कठीण असली तरी अशक्य नक्कीच नाही. कारण भगवंतानीच पुढे स्पष्ट केले आहे की, “हे कौंतेया अभ्यासाने आणि वैराग्याने ते नियंत्रित केले जाते”. समर्थांनी देखील अभ्यासाला, कष्टाला आणि प्रयत्नाला महत्व दिले आहे. आत्मज्ञान असो वा विज्ञान या सर्वासाठी अभ्यास आणि प्रयत्न यातील सातत्य फार आवश्यक आहे. यासाठी समर्थ साधक लक्षण समासामध्ये अभ्यासाचा संग धरण्यास सांगतात......
क्रमशः  


|| जय जय रघुवीर समर्थ ||