Wednesday, January 13, 2016

७. निंदा द्वेष करू नये | असत्संग धरू नये |

                                   || श्रीराम ||

|| समर्थ वाणी ||

७. निंदा द्वेष करू नये | असत्संग धरू नये |

                      निंदा द्वेष करू नये | असत्संग धरू नये |
                      द्रव्यदारा हरू नये | बळात्कारे || २/२/७||

      माणसाच्या बोलण्यावरून त्याच्या अंत:करणाची परीक्षा होते. त्याच्या शब्दातून त्याच्या मनातील वाईट किंवा चांगले विचार व्यक्त होत असतात. आपल्या मुखातून चांगले विचार व्यक्त होण्यासाठी परनिंदा करू नये असे सांगून निंद्य गोष्टींचा त्याग करण्यास समर्थ सांगतात. निंदेसारखे पातक नाही. आपण आपल्या मनात दुसऱ्या विषयी गैरसमज, राग, द्वेष यांना थारा देतो. दुसऱ्याविषयीच्या निंदेमुळे, रागामुळे आपलेच मन दुषित होत असते हे आपल्या लक्षात येत नाही. हा दोष स्वत:ला घातक आहेच पण यामुळे समाजाचे देखील नुकसान आहे. समाजातील संघटक वृत्तीला घातक असलेल्या या दोषाचा त्याग करा असे समर्थ वारंवार सांगतात.
      
       भगवद्गीतेत सतराव्या अध्यायात वाचिक तपाचे महत्व आले आहे भगवान श्रीकृष्ण सांगतात,
अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत ||
स्वध्यायाभ्यसनं चैव वाड्मयं तप उच्यते ||भ.गी. १७/१५||
      
         क्षोभ उत्पन्न न करणारे, खरे प्रिय व हितकर अशी वाणी आणि वेदांचे नित्य अध्ययन यास वाड्मय तप म्हणतात. या तपात अहंकाराचा त्याग आवश्यक आहे, बोलण्यावर नियंत्रण आवश्यक आहे.
      
          भगवद्गीतेत परमेश्वर प्रत्येक प्राणीमात्रात आहे हे सूत्र भगवंत आपल्याला सांगतात. त्या सूत्राला अनुसरून, सतत एखाद्याची निंदा केल्याने त्या व्यक्ती पासून मनुष्य आपोआपच दूर जातो. अर्थात त्याच्यामध्ये अंतरभूत असलेल्या ईश्वरी तत्वापासून तो दूर जातो. परमेश्वराशी जवळीक साधण्यासाठी प्रथम परस्परांशी प्रेमभावाने वागले तर आपोआपच परमेश्वर प्राप्तीचा आनंद लाभणार आहे.
      
        समर्थांनी देखील आपल्या प्रबोधनात आपल्याला प्राप्त झालेले वाणीचे सामर्थ्य जपून वापरण्यास सांगितले आहे. आपल्या वाणीला खोटे बोलण्यापासून, उद्धटपणापासून, निंदा करण्यापासून परावृत्त करावयाचे आहे. आपल्याला प्राप्त झालेल्या या शक्तीचा योग्य वापर करावयाचा आहे.....क्रमशः



जय जय रघुवीर समर्थ 

No comments:

Post a Comment