Wednesday, January 6, 2016

३. शारदास्तवन :


                                   || श्रीराम ||

|| समर्थवाणी ||

३. शारदास्तवन :

      शारदामातेचे स्तवन सर्व संतांनी आपल्या वाड्मयामध्ये केले आहे. श्रीशारदादेवी ही ज्ञानाची तसेच वाणीची देवता आहे. श्रीगणेश कृपेमुळे आपल्याला जो अर्थ समजतो, त्याला शब्दरूप देण्याचे सामर्थ्य आपल्याला देवी शारदा देते. आपल्या मनातील विचार शब्दांच्या माध्यमातून प्रगट होतो आणि कृतीमध्ये उतरतो. शारदामातेचे हे सामर्थ्य ओळखूनच संतांनी श्रीगणेशा बरोबरच शारदामातेचे स्तवन केले आहे.
      
      श्रीमद दासबोधामध्ये शारदामातेचे स्वरूप स्पष्ट करताना समर्थ रामदासस्वामी यांनी म्हंटले आहे की, ही वेदांची आई आहे, ब्रह्मदेवाची कन्या आहे, नादाचे जन्मस्थान आहे, आणि वाणीची ती स्वामिनी आहे. परमेश्वराने निर्माण केलेली ही मोठी माया आहे. या मायेच्या प्रभावामुळेच जे अव्यक्त आहे ते शब्दाद्वारे व्यक्त होते, त्याला आकार प्राप्त होतो. समर्थ म्हणतात वाणीच्या चार प्रकारांचे मूळ असलेली देवी शारदा ही ईश्वराची शक्ती आहे, जी सर्वांमध्ये असूनही सर्वापासून अलिप्त आहे. अशा या अवर्णनीय शारदामातेचे स्तवन संत महात्मे अत्यंत नम्रपणे आपल्या वाड्मयात करतात. कारण त्यांना याचे ज्ञान आहे की, आपल्याला जे वाणीचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे, आपल्या हातून जे ग्रंथ निर्मितीचे कार्य घडत आहे, ती केवळ या शारदामातेचीच कृपा आहे. हा भाव मनामध्ये ठेवूनच संत श्रीगणेश आणि आदिमाया शारदा या देवतेचे स्तवन करतात......क्रमशः

madhavimahajan17@gmail.com

|| जय जय रघुवीर समर्थ ||


No comments:

Post a Comment