Friday, January 8, 2016

५. कठीण शब्दे वाईट वाटते |

                                    || श्रीराम ||

|| समर्थ वाणी ||

५. कठीण शब्दे वाईट वाटते |

     समर्थांच्या वाड्मयामधून आदर्श मानवी जीवन कसे जगावे याचे मौलिक मार्गदर्शन घडते. वाचिक तपाचे महत्व जाणणारे समर्थ आपली वाणी कशी असावी याचे अचूक मार्गदर्शन त्यांच्या वाड्मयामधून करतात.
                  कठीण शब्दे वाईट वाटते | हे तो प्रत्ययास येते | 
                  तरी मग वाईट बोलावे ते | काय निमित्ये || दा. १२/१०/२३ ||
      ‘ उत्तमपुरुषाची लक्षणे ‘ या समासात याविषयी निरुपण करताना समर्थांनी स्वत:वरून दुसऱ्याचे अंत:करण कसे जाणावे याचे सोपे सूत्र सांगितले आहे. उत्तम गुणांपैकी वाणीची मधुरता हा गुण समर्थ प्रधान मानतात. माणसाने नेहमी स्वत:वरून दुसऱ्याची परीक्षा करावी. दुसऱ्याच्या कटू बोलण्याने जसे आपले मन दुखावते तसेच आपल्या कठोर शब्दाने दुसऱ्याचे मन दुखावू शकते हा विचार करण्यास समर्थ आपल्याला भाग पाडतात. या कृतीमधून बोलणाऱ्याला त्याक्षणाला जरी आनंद प्राप्त झाला तरी ज्याला बोलले जाते त्याचे मन दुखावले जाते. त्यातून दुसऱ्याचे मनात शत्रुत्वाची भावना जोपासली जाते आणि मग परस्परांविषयी राग द्वेष वाढत जातो. यासाठी मनाच्या श्लोकात देखील समर्थ म्हणतात की, 
                 स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे | मना सर्व लोकासी रे नीववावे || ७ || 
      त्यांच्या या विचारातून त्यांचा सामाजिक मानसशात्राचा सूक्ष्म अभ्यास दृष्टीस पडतो.
लोकसंग्रहाच्या दृष्टीने समर्थांनी वाणीचे महत्व वारंवार स्पष्ट केले आहे. आजच्या युगात देखील कामाच्या ठिकाणी “ टीमवर्क” असते तेव्हा परस्परांच्या सहकार्याने कोणतेही काम पूर्णत्वाला जात असते. अशावेळी एकमेकांना साक्जून घेऊन कोणाचे मन न दुखावता काम करणे गरजेचे असते. आपली वाणी जर गोड असेल, दुसऱ्याला जाणून घेण्याची क्षमता असेल तर अशा व्यक्ती जीवनात यशाच्या शिखराच्या दिशेने वाटचाल करताना आपणा पाहतो.
दुसऱ्याला दुखावणारी वाणी ही अपवित्र असल्याचे समर्थाचे स्पष्ट मत आहे. समर्थ दासबोधामध्ये तोंडाळ, कठोरवचनी, शीघ्रकोपी माणसाला राक्षस संबोधले आहे. 
                 ऐसे लौद बेईमानी | कदापि सत्य नाही वचनी | 
                 पापी अपस्मार जनी | राक्षेस जाणावे || ( द.१८/६/५)
       शब्द हे अस्त्र आहे ते जपूनच वापरले पाहिजे. शब्दाचा वापर विवेकाने तसेच विचाराने केला पाहिजे. दुसऱ्याला दु:खी करणारे कटू शब्द नेहमीच कटूता वाढवितात. अशा शब्दांना थारा न देता बोलण्या वागण्यात नम्रता आणावी. संघटनेला महत्व देणारे समर्थ या सध्या सोप्या सूत्रांच्या आधारे संघटनेचे सोपे पण अवघड सूत्र शिकवून जातात.   
       प्रभू रामचंद्र हे समर्थाचे उपास्य दैवत होते. दशरथनंदन श्रीराम, आयोध्येचा भावी राजा प्रजाजनामध्ये मिसळत असे. सर्वाची दु:खे जाणून घेत असे. त्याच्या लाघवी बोलण्याने,  नम्र वाणीमुळे प्रजाजनांना दिलासा मिळत असे. समर्थ हाच आदर्श समोर ठेऊन आचरण करीत असत.......क्रमशः



जय जय रघुवीर समर्थ  

No comments:

Post a Comment