Monday, January 4, 2016

२ बुद्धी देणे भगवंताचे

                                     || श्रीराम ||

|| समर्थवाणी ||

२ बुद्धी देणे भगवंताचे
माणूस हा बुद्धिमान प्राणी म्हणून गणला जातो. त्याला बुद्धिची सर्वात मोठी देणगी परमेश्वराने बहाल केली आहे. समर्थ म्हणतात,
बुद्धि देणे भगवंताचे |बुद्धिविना माणुस काचे |
राज्य सांडून फुकाचे | भीक मागे || दा. १५/१/१५ ||
माणसाला बुद्धीचे सामर्थ्य भगवंताकडून प्राप्त झाले नसे तर मनुष्य आणि पशू यांच्यात काही भेद राहिला नसता. परंतु आपल्याला प्राप्त जाह्लेल्या या सामर्थ्याचा मनुष्यप्राणी अनेकदा दुरुपयोगच करतो. उत्तम बुद्धीचे सामर्थ्य प्राप्त होऊन देखील त्याचा योग्य वापर न करणाऱ्या लोकांबद्दल समर्थ वरील ओवीत म्हणतात को जो बुद्धिचा योग्य उपयोग करत नाही तो जणू काय राज्य टाकून भीक मागत फिरणारा करंटा आहे. स्वत:कडे असणाऱ्या बुद्धिचे ऐश्वर्य सोडून भीक मागणाऱ्या करंट्यानां समर्थ याठिकाणी उपदेश करत आहेत. आपण ज्या बुद्धी बद्दल बोलत आहोत ती बुद्धि म्हणजे काय ? बुद्धिने निर्णय घ्यायचा म्हणजे नेमके काय करायचे? या शंकेचे निरसन समर्थ सतराव्या दशकात करतात.
संकल्प विकल्प तेचि मन | जेणे करितां अनुमान | पुढे निश्चयो तोचि जाण | रूप बुद्धिचे || १७/८/६/
करीनचि अथवा न करी | ऐसा निश्चयेची करी | तोची बुद्धि हे अंतरी | विवेके जाणावी || १७/८/७/
संकल्प विकल्प करणारी जी जाणीव तेच मन समजावे. मनामध्ये जेव्हा अनुमान करणे चालते आणि त्यातूनच नंतर निश्चय घडतो तेव्हा जाणीवेला बुद्धिचे रूप आले असे समजावे. ‘ मी हे करीन ‘ किंवा ‘ मी हे करणार नाही ‘ असा मी निश्चय करते तीच बुद्धि होय. विवेकाने आपल्या अंतर्यामी हे जाणावे. या बुद्धीच्या योगाने साधकाने आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावे. भगवद गीतेत भगवंत म्हणतात, ज्याची बुद्धि परब्रह्माच्या ठिकाणी रमते किंवा तेच आपण आहोत अशी भावना ज्याची बुद्धि करते, त्याचाच निजध्यास ज्याची बुद्धि करते, त्याची या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटका होते ( अ.५.श्लो.१७ ) माऊली म्हणतात,
बुधिनिश्चये आत्मज्ञान | ब्रह्मरूप भावी आपणा आपण | ब्रह्मनिष्ठ राखे पूर्ण | तत्परायण अहर्निशी||
आत्मज्ञानासंबधी त्याच्या बुद्धिचा निश्चय झाला म्हणजे, साधक आपणच आपल्याला ब्रह्मरूप मानू लागतो आणि आपली वृत्ती पूर्णब्र्हमाकार ठेवून रात्रंदिवस त्याच्याच अनुसंधानात असतो. अशा या ज्ञानी पुरुषाची दृष्टी सर्वांच्या ठिकाणी सारखीच असते.......क्रमशः
जय जय रघुवीर समर्थ

No comments:

Post a Comment