Tuesday, January 19, 2016

९. यत्न तो देव जाणावा | यत्नेवीण दरिद्रता |

                                      || श्रीराम ||

|| समर्थ वाणी ||

९. यत्न तो देव जाणावा | यत्नेवीण दरिद्रता |
     
      समर्थांनी आपल्या कृतीतून तसेच विचारातून प्रयत्नवादाचा पुरस्कार केला. ‘यत्न तो देव जाणावा | यत्नेवीण दरिद्रता |’ ही समर्थांची उक्ती सर्वांना अत्यंत उपयुक्त आहे. या बोधवाक्यामधून समर्थ आपल्याला प्रयत्नांना देव मानण्याची शिकवण देतात. कोणत्याही गोष्टीमध्ये यशस्वी होण्यासाठी ‘अचूक’ प्रयत्नांबरोबर कष्टाची तयारी असेल तर यशश्री नक्कीच प्राप्त होणार आहे. केवळ दैवावर हवाला ठेवून कोणतीच गोष्ट सध्या होत नाही हे जाणूनच समर्थांनी प्रयत्नवादाचा पुरस्कार केला आहे. यासाठी आळस सोडून अविरत परिश्रम करून ध्येय गाठता आले पाहिजे. अचूक प्रयत्न न करता अपयशाच्या पायरीवर जर कोणी रडत बसला तर तो कधीच यशस्वी होऊ शकणार नाही.
                  मनी धरावे ते होते | विघ्न अवघे नासोनी जाते || ६.७.३०||
      मनाचे सामर्थ्य एवढे आहे की  मनाने जर कोणता संकल्प केला तर तो कोणतीही विघ्ने न येता पार पडतो. इतरत्र धावणारे मन विवेक वृत्तीने आवरावे. अचूक प्रयत्नाने कोणतीही गोष्ट सहज साध्य होते हा समर्थांचा धृढ विश्वास आहे.

कष्टेविण फळ नाही | कष्टेविण राज्य नाही |
कष्टेविण होत नाही | साध्य जनी ||१८.७.३||
     
      समर्थांच्या या उक्ती मधून मनाच्या संकल्प शक्तीचा प्रत्यय येतो. अचूक प्रयत्न आणि जिद्द तसेच कष्ट केल्याने सुखाची प्राप्ती होते. मनुष्याने जर अचूक प्रयत्न केले तर त्याच्या ऐहिक, पारलौकिक, पारमार्थिक सुखाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. पण प्रयत्नाची कास न धरता जर केवळ दैवावर हवाला ठेवून आळशीपणा केला तर मात्र अपयश पदरात पडते. आळस हा माणसाचा महाशत्रू आहे. तो त्याच्या प्रगतीच्या विकासाच्या आड येतो .म्हणून समर्थ आपल्याला आळसा पासून दूर राहण्याची शिकवण देतात. या आळसाने काय होते तर ,

आळसे गेली धारणा वृत्ती | आळसे मळिन जाली वृत्ती |
आळसे विवेकाची गती | मंद जाली ||८.६.२३||
आळस हा प्रयत्न बुडवणारे आहे. आचार विचारापासून दूर नेणारा आहे. असा हा करंट्याना आवडणारा आळस सोडून सतत कार्यरत राहा हा संदेश समर्थ आपल्याला देतात......क्रमशः

                        || जय जय रघुवीर समर्थ ||

No comments:

Post a Comment