Sunday, March 6, 2016

२२. लोभी धन साधू गेले | तव ते लोभी धनचि जाले |

|| समर्थ वाणी ||

२२. लोभी धन साधू गेले | तव ते लोभी धनचि जाले |
       मग ते भाग्यपुरुषी भोगिले | सावकाश ||८/१०/७९||

लोभी माणूस वस्तूंचा संग्रह करत रहातो. भरपूर धन कमावतो पण त्याचा उपभोग मात्र घेत नाही. त्याची वृत्ती केवळ धनमय होऊन जाते. तो मिळवलेले धन केवळ साठवून ठेवतो. परंतु त्याच्या मागून कोणीतरी भाग्यवान त्या धनाचा यथेच्छ उपभोग घेतो.  मनाची शांती भंग पावण्यासाठी लोभ, कामवासना याचा मोह करणीभूत ठरतो. एखाद्या व्यक्तीबद्दल आत्यंतिक आकर्षण याला ‘काम’ म्हणतात तर एखाद्या वस्तूबद्दल आत्यंतिक आकर्षणाला ‘लोभ’ म्हणतात. या व्यक्ती वाचून अथवा वस्तू वाचून जिणे व्यर्थ वाटू लागते. हाच ‘मोह’ होय. लोभ हा गरजेपोटी नसतो तर वासनेपोटी असतो. त्यातून कधीच तृप्ती होत नाही. तृप्ती न होणे हाच तर लोभाचा स्वभाव आहे. स्त्री लोभा इतकीच तीव्र वासना धनाची असते. कितीही पैसा मिळवला तरी माणसाच्या गरजा भागात नाहीत. तो अधिकाधिक धन संचायाच्या मागे लागतो. कुटुंबाच्या सुखासाठी, सोयीसाठी न कळत कुटुंबापेक्षा धनाला अधिक प्राधान्य दिले जाते. पुरेसे अन्न, वस्त्र,निवारा या प्रमुख गरजा भागल्या तरीही भोगवादाच्या आहारी गेलेल्या माणसांचा लोभ सुटत नाही. लोभाला मर्यादा नसते. सतत अतृप्त ठेवणारा लोभ माणसाच्या दु:खालाच कारणीभूत ठरतो. हा लोभाच माणसाच्या मनात क्षोभ निर्माण करतो. समर्थ म्हणतात,
पुरेना जनी लोभ रे क्षोभ त्याते | म्हणोनी जनी मागुता जन्म घेते
लोभामुळे पुनरपि जननं पुनरपि मरणं मागे लागते. यासाठी या विकारापासून दूर राहण्यास समर्थ सांगतात....क्रमशः


|| जय जय रघुवीर समर्थ ||  

No comments:

Post a Comment