Monday, March 21, 2016

२८. आपणास चिमोटा घेतला | तेणे कासाविस जाला |


|| समर्थ वाणी ||

२८. आपणास चिमोटा घेतला | तेणे कासाविस जाला | 
आपणावरून दुसऱ्याला | राखत जावे ||१२/१०/२४||

            लोकसंग्रहाच्या दृष्टीने उपयुक्त असे सूत्र समर्थ याठिकाणी सांगत आहेत. माणसाने नेहमी स्वत:वरून दुसऱ्याची परीक्षा करावी अस म्हणतात. माणसांची जिव्हा हे असे इंद्रिय आहे की त्यावर संयम खूप अवघड आहे. मग तो बोलण्याचा असो अथवा खाण्याचा. याठिकाणी आपल्या बोलण्यावर संयम कसा ठेवावा याविषयी सांगताना समर्थ वरील दृष्टांत देतात. आपल्याशी जर कोणी गोड शब्द बोलले तर मनाला आनंद होतो, हा तर आपला अनुभव आहे मग स्वत: वरून दुसऱ्याला आपल्यासारखेच मानावे असे समर्थ सांगतात. कोणी आपल्याशी कठोर बोलले तर मनाला यातना होतात. मग आपण कोणाला कठोर बोलताना निश्चितच असंख्य वेळा विचार केला पाहिजे. आपल्याला चिमटा घेतला तर आपल्याला वेदना होतात हे लक्षात ठेवून दुसऱ्याला दु:ख देऊ नये. जेव्हा एखादे काम समूहामध्ये करत असाल तेव्हा नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीने तर या सूत्रांचा निश्चितच विचार करणे गरजेचे आहे.

            लोकसंग्रह करायचा असेल तर कठोर वाणीचा त्याग करता आला पाहिजे. कारण अशी वाणी दुसऱ्या बरोबर स्वत:चा देखील नाश करू शकते. आपण जे पेरतो तेच उगवते हा तर नियम आहे. आपलं जसे बोलतो तसेच प्रतिउत्तर येते याचेही भान असावे. हे सूत्र लक्षात आले म्हणजे मग विनाकारण कठोर आणि कटू शब्द बोलले जाणार नाहीत. कठोर वाणी असणाऱ्यांची समर्थ निर्भत्सना करतात. ज्यांची वाणी कठोर आहे, जे तोंडाळ, शीघ्रकोपी, आहेत त्यांनां समर्थांनी राक्षस म्हणून संबोधले आहे.
           
            लोकसंग्रह करताना ‘माझेच म्हणणे खरे’ असे म्हणून चालणार नाही. लोकांना बरोबर घेऊन कार्य पूर्ण करावे.सैन्यावाचून एकटा सेनापती जसा लढू शकत नाही त्याचप्रमाणे नेतृत्व करणारा अनेकांशी भांडून एकटा कार्य करू शकत नाही. त्याने कार्य करताना सर्वांना आपलेसे करून ठेवावे......क्रमशः


|| जय जय रघुवीर समर्थ || 

4 comments:

  1. फारच सुंदर
    केवळ एक दुरुस्ती सुचवावीसी वाटते
    रामदास स्वामी यांचा समर्थ असा उल्लेख चुकीचा वाटतो कारण तो त्यांनी रघुविरांसाठी वापरला आहे. समर्थ हे नाव स्वामींच्या नावापुढे प्रचलित झाले असले तरी ते चुकीचे वाटते. आपण अभ्यासक असल्याने माझ्या शंकेचे निरसन कराल अशी आशा आहे

    ReplyDelete
    Replies
    1. Bhaktichi prapti toch ki krishna toch arjun ani arjun tochikrishna doghat bhed nahi ...datatrayanchya artit samarthanni lihilele aahe "mi tu panachi zali bolvanbolany" he toch aahe..

      Delete
    2. धन्यवाद. आपण म्हणता ते बरोबर आहे समर्थांनी समर्थ ही उपाधी प्रभूरामचंद्रांनाच दिली आहे. परंतु समर्थांच्या एकंदर कार्याचा आढावा घेतला असता रामदासस्वामीनां देखील समर्थ म्हणावे वाटते.

      Delete