Saturday, March 12, 2016

२६. रूपलावण्य अभ्यासिता न ये | सहजगुणास न चले उपाये |

|| समर्थ वाणी ||

२६. रूपलावण्य अभ्यासिता न ये | सहजगुणास न चले उपाये |
काही तरी धरावी सोये | अगांतुक गुणांची || १४/६/१||

चातुर्य लक्षणातील ही ओवी समर्थांनी यापूर्वी दुसऱ्या दशकात देखील सांगितली आहे. सद्विद्या लक्षणामध्ये त्रिगुणांमध्ये वावरणाऱ्या माणसाला आत्मसुधारणा होण्यासाठी एका आदर्शाची जरुरी असते. सद्विद्या लक्षणामध्ये अशा आदर्श पुरुषाची लक्षणे समर्थांनी सांगितली आहेत. यामध्ये ज्या उत्तम गुणांची यादी समर्थ देतात हे उत्तम गुण प्रयत्न केले तर सहज साध्य होतात. प्रयत्नपूर्वक ते अंगी बनण्याचा प्रयत्न करावा असे समर्थ आवर्जून सांगतात.
समर्थांनी चौदाव्या दशकामध्ये देखील पुन्हा हाच विषय विस्ताराने सांगितला आहे. प्रत्येक माणसाला जगामध्ये थोडा तरी बदल करता येणे शक्य आहे हा समर्थांचा विश्वास आहे. पण त्यासाठी स्वत:मध्ये त्याने बदल करून घेणे आवश्यक आहे. जग बदलण्यापूर्वी या सुधारणेची सुरवात प्रत्येकाने स्वत:पासून करावी. आपल्याला प्राप्त झालेले रूप आणि सौंदर्य हे गुण अभ्यासाशिवाय प्राप्त झालेले आहेत. यामध्ये आपण कोणताच बदल करू शकत नाही. परंतु उत्तम गुण मात्र अभ्यासपूर्वक प्रयत्न केले तर सहज साध्य होऊ शकतात. या उत्तम गुणांचे वैशिष्य हे की या गुणांमुळे माणसाचे सौंदर्य अधिक खुलून येते. लोकांना त्याचा सहवास प्रिय होतो. जो माणूस चातुर्याने आपले अंतरंग सुधारतो तो खरा भाग्यवान ठरतो.

चातुर्य श्रुघारे अंतर | तेणे लोकांच्या हातासि काये आले | दोहीमध्ये कोण थोर | बरे पहा ||१४/६/१८||

आपल्या शहाणपणाने जो आपले अंतरंग सुधारतो आणि जगाचे कल्याण साधतो तो खरा भाग्यवान. असे भाग्यवान होण्यासाठी सतत उत्तमाचा पाठपुरावा करावा आणि उत्तम गुण अंगी बनावेत. स्वत: बरोबर अनेकांचा उद्धार करावा .....क्रमशः

|| जय जय रघुवीर समर्थ ||

No comments:

Post a Comment