Monday, March 7, 2016

२३. मनी धरावे ते होते | विघ्न अवघेची नासोन जाते |

|| समर्थ वाणी ||

२३. मनी धरावे ते होते | विघ्न अवघेची नासोन जाते |
      कृपा केलिया रघुनाथे | प्रचिती येते || ७/६/३०||

            या ओवीमध्ये समर्थांनी आपल्या उपासनेविषयी विस्ताराने सांगितले आहे. त्यांनी प्रभू रामचंद्रांची जी उपासना केली, त्याचे फळ त्यांना कसे उत्तमच मिळाले त्यांना काय प्रचीती आली याचे वर्णन समर्थ करतात. त्यांनी ज्या उच्चतम ध्येयाचा ध्यास घेतला ते त्यांना साध्य झाले तो अनुभव त्यांनी याठिकाणी व्यक्त केला आहे. या ओवीतील ‘मनी धरावे ते होते | विघ्न अवघेची नासोन जाते |’ हा पूर्वार्ध चिंतन, मनन करण्यासारखा आहे. यामधून समर्थ आपल्याला सकारात्मक विचार करण्यास प्रवृत्त करतात. कोणत्याही गोष्टीचा एकदा संकल्प केल्यानंतर ध्येय साध्य होई पर्यंत चिकाटीने सातत्याने कृती करत राहणे , त्याचा ध्यास घेणे हे महत्वाचे असते. पण त्यासाठी आपल्या ध्येयाचा आपण मनापासून स्वीकार करणे आवश्यक असते. कोणी म्हणाले म्हणून एखादी कृती करणे आणि मी मनापासून एखादी गोष्ट करणे यामध्ये फरक आहे.
            साध्या साध्या गोष्टीतून याचा प्रत्यय येतो. कोणत्याही गोष्टीची शिस्त ही इतर लावतात तोपर्यंत ते काम आपल्या कडून सहजपणे होत नाही, पण जेव्हा मी माझ्या मनाने ठरवते तेव्हा तीच शिस्त किंवा कृती माझाकडून सहजपणे होते. याचाच अर्थ माझा मनाचे सामर्थ्य असे आहे की मला जर काही उत्तम साध्य करावयाचे असेल तर माझे विचार, माझा आचार त्याचदृष्टीने कार्यरत राहिला तर मला माझे साध्य अचूक प्रयत्नाने साध्य होते. उदा. सकाळी लवकर उठणे, यासाठी गजर लावावा लागतो किंवा कोणाला तरी उठवायला सांगावे लागते. पण जेव्हा मी लवकर उठायचा मनाने ध्यास घेते तेव्हा गजर होण्याआधी मला जाग येते.  व्यायाम करणे, रोज चालणे याचे शरीरावर होणारे उत्तम परिणाम याविषयी आपण बरेच काही ऐकतो, वाचतो पण ते आचरणात मात्र आणत नाही याचे कारण आळस. ही झाली अगदीच सर्वसामान्य उदाहरणे. पण यामध्ये देखील अनेक जण यशस्वी होत नाही. पण जे यशस्वी होतात त्यांची जीवनशैली जाणून घेतली तर त्यांचे सातत्य,चिकाटी, उत्तमाचा घेतलेला ध्यास याचा प्रत्यय येतो. यासाठी समर्थांनी आपल्याला उत्तम सवयी लावून घेण्याचे मार्गदर्शन केले आहे. हे आपण ‘सवे लावता सवे पडे’ ( निरुपण १२ ) या निरुपणात पहिलेच आहे. समर्थांनी अचूक प्रयत्नावर भर दिला आहेच पण त्याचबरोबर सकारात्मक विंचारांचे महत्व देखील आपल्याला पटवून दिले आहे....क्रमशः


|| जय जय रघुवीर समर्थ || 

No comments:

Post a Comment