Wednesday, March 9, 2016

२५. हे अवघे आपणापासी | येथे बोल नाही जनासी |

|| समर्थ वाणी ||

२५. हे अवघे आपणापासी | येथे बोल नाही जनासी |
      सिकवावे आपल्या मनासी | क्षणाक्षणा || १२/२/२३||

      आपल्या जीवनात सुख भोगायचे का दु:ख हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. या बाबत कोणाला दोषी धरता येत नाही. हाच विचार आपण सतत आपल्या मनावर बिंबवत राहिले पाहिजे. भगवद्गीतेत देखील भगवंत आपल्याला सांगतात तू तुझा मित्र व्हायचे का शत्रू हे ठरवणे सर्वस्वी तुझा हातात आहे. नकारात्मक विचारांना आपल्या मनात थारा दिला तर आपणच आपले शत्रू ठरतो आणि सकारात्मक विचार मनात स्थान दिले तर आपण आपले मित्र होतो.

      समर्थ या ठिकाणी जनात वावरताना कसा व्यवहार असावा याविषयी मार्गदर्शन करतात. आपण लोकांशी चांगले वागतो तर आपल्या जीवनात सुखाची वाढ होते. पेरावे तसे उगवावे हा तर नियमच आहे. जो माणूस जसे बोलतो तसेच वागतो त्याचा मान जनामध्ये राहतो. त्याचा सर्वजण आपोआपच आदर करतात. व्यक्तीमध्ये असणारा उत्तम गुण जोपर्यंत लोकांमध्ये प्रगट होत नाही तो पर्यंत लोकाना त्याच्या योग्यतेची कल्पना येत नाही. पण त्याच्या अंगचे उत्तम गुण जेव्हा लोकांमध्ये प्रगट होतात तेव्हा तेव्हा लोकांचे मत हळूहळू बदलू लागते. आपल्या बद्दलचे लोकमत बदलत जाऊन स्वच्छ मत तयार झाले की लोकांचे प्रेम अपोआप संपादन करतात येते. 

       जेव्हा कोणी आपल्या मनातील गुपित विश्वासाने तुम्हाला सांगते तेव्हा ते रहस्य चार माणसात प्रगट करू नये. पण अनेकांना दुसऱ्याची दु:ख हा चर्चेचा विषय करायला आवडते. आपल्याच भाषेत बोलायचे झाले तर ‘गॉसिप’ हा शब्द पटकन लक्षात येईल. दुसऱ्याच्या दु:खाचे ‘गॉसिप’ करणे हे कुलक्षण आहे. अशाने त्या व्यक्तीचे अंत:करण तर दुखावतेच पण अनेकांच्या मनातील आपल्या विषयीचा विश्वास देखील आपण गमावून बसतो. परस्परांना दुखावून भांडणे वाढतच जातात त्यामुळे लोकांना व आपल्याला दुखीकष्टी व्हावे लागते. या सगळ्यामधून माझा आणि इतरांच्या जीवनात दु:ख निर्माण होते. समर्थ म्हणतात हे सगळे टाळायचे असेल तर तू विवेकाने विचार करून जनात वावर आणि आपल्या आणि इतरांच्या मनात आनंद निर्माण कर....क्रमशः


|| जय जय रघुवीर समर्थ ||  

No comments:

Post a Comment