Sunday, March 20, 2016

२७. पर्णाळि पाहोन उचले | जीवसृष्टी विवेके चले |

|| समर्थ वाणी ||

२७. पर्णाळि पाहोन उचले | जीवसृष्टी विवेके चले |
आणि पुरुष होऊन भ्रमले | यासी काय म्हणावे || १२/१/११||

प्रापंचिक माणसाने प्रपंच आणि परमार्थ करताना सतत सावध राहणे गरजेचे आहे. ‘सावधपण सोडू नये’ असे सांगून सतत सावधानतेचा इशारा देणारे समर्थ याठिकाणी एक सुरेख दृष्टांत देतात. झाडाच्या पानावरील कृमीकीटक देखील विचारपूर्वक पाउल उचलतात. मग माणसाने तर विवेकाने वागलेच पाहिजे. सारे जीवप्राणी विचारपूर्वक कर्म करतात, मग सर्व प्राणीमात्रात सर्वश्रेष्ठ असणाऱ्या माणसाने अविवेकाने का वागावे ? जगात वावरताना आपल्या सभोवताली काय चालू आहे याचे भान माणसाला असणे आवश्यक आहे. सर्व बाजूंचा विचार करून जो सावधपणे जगतो तो खरा आनंदी होतो. पण परिस्थिती नीट समजून घेतली नाही तर कोणते संकट केव्हा कोसळेल याचा नेम नसतो. बरेचदा असा प्रसंग येतो की संकटात सावरायला देखील वेळ मिळत नाही. यासाठीच प्रत्येक कर्म करताना सावधगिरी बाळगून कर्म करावे अशी सावधगिरीची सूचना समर्थ देत आहेत.
यासाठी आपल्या आसपास असणारे अनुभवी, दूरदृष्टी असणारे लोक काय विचार करतात ते पहावे. दुसऱ्यापासून शिकावे ही जनरीतच आहे. त्यामुळे आपल्या भोवतालची शहाणी माणसे शोधून काढावीत आणि त्यांच्यातील गुण आत्मसात करावेत. त्यांच्या सहवासात राहून आपल्या अवगुणांचा प्रयत्नपूर्वक त्याग करावा. आपल्या सहवासातील माणसांची योग्यता ओळखून असावे. याचा अर्थ कमी योग्यतेच्या माणसांचा अवमान करावा असे नाही. तर कोणाचे मन दुखवू नये पण मनोमनी योग्यता ओळखून असावे. प्रत्येकाची योग्यता ओळखून त्यांना धोरणाने जवळ करावे अथवा लांब ठेवावे. ज्या माणसाला जेवढे महत्व किंवा मोठेपण द्यावयाचे तेवढे त्यास बरोबर देण्याचे चातुर्य या जगात जगताना आले पाहिजे.....क्रमशः

|| जय जय रघुवीर समर्थ ||

madhavimahajan17@gmail.com

3 comments: