Tuesday, March 8, 2016

२४. वाट पुसिल्याविण जाऊ नये | फळ वोळखील्याविण खाऊ नये |

|| समर्थ वाणी ||

२४.   वाट पुसिल्याविण जाऊ नये | फळ वोळखील्याविण खाऊ नये |
         पडिली वस्तु घेऊ नये | येकायेकी || २/२/२ ||

समर्थ रामदासांच्या श्रीमद दासबोधाचा उल्लेख निघाला की आठवतात ती मूर्खलक्षण. समर्थांनी व्यक्ती विकासाच्या दृष्टीने जशी मूर्खलक्षणे सांगितली तशीच उत्तम लक्षणे देखील सांगितली. या लक्षणांमधून समर्थ आपल्याला सध्या सोप्या व्यावहारिक सूचना देतात. मूर्खलक्षणामध्ये समर्थांनी मानवी स्वार्थी वृत्तीचे दर्शन घडवले आहे. पण तुम्हाला तुमचा उत्तम विकास करून घ्यायचा असेल तर सतत सावध राहून तसेच वृत्तीत बदल करून आपल्यातील उत्तम गुणांचा विकास करून घेतला पाहिजे. यासाठी समर्थ या ओवीत व्यवहारात वागताना, या भौतिक जगात वावरताना कीती सावधगिरी बाळगा हे सांगत आहेत.
आपल्याला ज्या ठिकाणी जायचे आहे त्याठिकाणचा पत्ता नीट विचारल्याशिवाय जाऊ नका. आपण बाहेर पडताना ही काळजी घेतोच. पण आजकाल भ्रमणध्वनी ध्वनी हे माध्यम असे आहे की त्याच्या आधार आपण अत्यंत निर्धास्तपणे घर बाहेर पडतो. पण शेवटी ते एक यंत्र आहे याचा आपल्याला विसर पडतो. बरेचदा संपर्क साधण्यात आपल्याला अडचणी येतात. ज्या व्यक्तीला संपर्क साधायचा ती संपर्क क्षेत्राच्या बाहेर असते. अनेक अडचणी येऊ शकतात. पण प्रवासाला निघण्यापूर्वीच पत्ता नीट समजून घेण्याची सावधगिरी बाळगली तर आपला प्रवास ताणरहित होतो तसेच पत्ता शोधण्यात आपला वेळ देखील वाया जात नाही. आपला वेळ हा मौल्यवान आहे. त्याचा अपव्यय समर्थांना मान्य नाही यासाठी ते या बारीकसारीक गोष्टींचा विचार करतात आणि आपल्याला देखील असा विचार करावयाला प्रवृत्त करतात.
फळ ओळखील्याविण खाऊ नये: या ओंवीमधील सर्व सुचना आज देखील विचारात घेण्यासारख्या आहेत. ज्या पदार्थाचे सेवन करायचे आहे त्याची पूर्ण  माहिती असल्याशिवाय खाल्ले तर बरेचदा विषबाधा होण्याचा संभाव असतो अथवा त्याचे अन्यत्र काही त्रास होण्याची शक्यता असते. कोणतेही दुष्परिणाम होऊन शरीराला त्रास होण्यापेक्षा आधिच सावधगिरी बाळगा असे समर्थांचे सांगणे आहे. आजकाल तर ‘फळ ओळखीविण घेऊ नये’ अशी म्हणायची वेळ आली आहे. परिचय नसताना शेजारची व्यक्ती खाण्याच्या पदार्थातून गुंगीचे औषध देऊन लुबाडून नेते अशा अनेक घटना आपण रोजच वाचतो. अशा या परिस्थितीमध्ये यासर्व सूचना निश्चितच उपयोगी ठरतात.
अनोळखी वस्तूना हात लावण्याचे दुष्परिणाम अनेकांनी अनुभवले आहेत. आज अनेक ठिकाणी या सूचनांचे फलक लावलेले दिसतात की अनोळखी वस्तूना हात लावू नये, संशयास्पद वस्तू आढळल्यास पोलिसांना कळवण्यास सांगतात. याचा अर्थ असाच की कोणत्याही गोष्टीतील बेसावधपणा आपल्याला हानिकारक आहे. यासाठी समर्थ या सर्व सुचना देत आहेत......क्रमशः


|| जय जय रघुवीर समर्थ ||  

No comments:

Post a Comment